एक-एक करुन इराणच्या शास्त्रज्ञांना संपवण्यामागे कोणाचा हात? जाणून घ्या

कार्तिक पुजारी
Sunday, 29 November 2020

इराणच्या अणु कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक मोहसेन फखरीजाहेद यांची तेहरानमध्ये हत्या झालीये. इराणने या हत्येमागे इस्त्राईलचा हात असल्याचा आरोप केलाय .

इराणच्या अणु कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक मोहसेन फखरीजाहेद यांची तेहरानमध्ये हत्या झालीये. इराणने या हत्येमागे इस्त्राईलचा हात असल्याचा आरोप केलाय . त्यामुळे पुन्हा एकदा प्रख्यात गुप्तचर एजेंसी मोसाद चर्चेत आलीये. याच पार्श्वभूमीवर मोसाद नेमकी आहे काय आणि तिने काय-काय कारनामे केलेत हे आपण पाहूया.

जगातील सर्वात खतरनाक गुप्तचर संस्था म्हणून मोसादचं नाव घेतलं जातं. अमेरिकेच्या सीआयएनंतर इस्त्राईलच्या मोसादचाच क्रमांक लागतो. मोसादला इस्त्राईलची किलिंग मशीन असंही म्हटलं जातं. या संस्थेबद्दल अनेक चित्तथरारक कहाण्या आहेत.  मोसाद शत्रूंना जगात कोठेही लपून बसले असले तरी शोधून काढते, आणि एक दिवस त्यांना नक्की संपवते असं म्हटलं जातं. शत्रूंना यमसदनी पाठवणं हाच त्यांचा  इरादा नसतो, तर त्यांना शत्रूंच्या मनात भीती निर्माण करायची असते, जेणेकरुन पुन्हा कोणी इस्त्राईलशी पंगा घेण्याचा विचार करु नये. 

शत्रूंना त्यांच्याच देशात जाऊन संपवणारी इस्त्राईलची 'मोसाद'; इराणी...

मोसादने इराणमध्ये अनेक हत्या घडवून आणल्याचं सांगितलं जातं. मोहसेन फखरीजादेह यांच्यासह आतापर्यंत ५ अणु शास्त्रज्ञांची हत्या झालीये. २००२ मध्ये शास्त्रज्ञ मसूद अली मोहम्मदी यांना रिमोट-कंट्रोल्ड बॉम्बने उडवण्यात आलं होतं, तर अणु शास्त्रज्ञ माजिद शहरियार यांच्या कारवर बॉम्ब फोडून हत्या करण्यात आली होती. २०११ मध्ये शास्त्रज्ञ दारिउश  यांना मोटारसायकलवरुन आलेल्या शस्त्रधाऱ्यांनी गोळ्या घातल्या होत्या. या पाचही वैज्ञानिकांची कामावर जाताना किंवा कामावरुन परतत असताना हत्या करण्यात आली. 2018 मध्ये इराण अणु कार्यक्रमाचे कागदपत्रे चोरी करण्यामागे मोसादच होती. 

मोसादने आपल्या स्थापनेपासून अनेक अशक्य वाटणारे कारणामे करुन दाखवलेत. १९७२ मध्ये म्यूनिक ऑलिम्पिक दरम्यान जगभरातील खेलाडू जमा झाले होते. यावेळी एक धक्कादायक घटना घडली. इस्त्राईल ऑलिम्पिक टीमच्या ११ खेलाडूंना त्यांच्या हॉटेलमध्येच मारण्यात आलं. हे  कृत्य Black September आणि Palestine Liberation Organization ने केलं होतं. या घटनेनंतर पेटून उठलेल्या इस्त्राईलने बदला घेण्याची योजना बनवली. त्यानंतर जे घडलं ते सर्व एका चित्रपट कथेला साजेसंच होतं. पुढील २० वर्षात मोसादने जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन सर्व आरोपींना संपवलं. प्रत्येक आरोपीला ११ गोळ्या घालण्यात आल्या, ११ खेलाडूंच्या बदल्यात ११ गोळ्या असा त्याचा अर्थ होता.

पॅलेस्टिनचे नेता यासिर अराफात यांचा उजवा हात असलेला अबू जिहाद ट्यूनीशियात लपला होता. अबू जिहाद मोसादच्या हिट लिस्टमध्ये होता. त्याला मारण्यासाठी ३० एजेंट कामाला लागले. सर्व एजेंट हळूहळू ट्यूनिशियात पोहोचले. काहींनी बेकायदेशीररित्या तेथील सैनिकांचा यूनिफॉर्म घातला होता. सर्व एजेंट अबू जिहादच्या घरात घुसले. सुरुवातीला त्याच्या सुरक्षारक्षकांना मारण्यात आले, नंतर अबू जिहादला तब्बल ७० गोळ्या मारण्यात आल्या. अशीच कारवाई मोसादने दुबईमध्ये केली होती. ज्यू सैनिकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्या महमूद अल मबूह याला हॉटेलमध्ये असताना इंजेक्शन देऊन मारण्यात आलं होतं.

चीन, रशियाच्या कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध

असे चित्तथरारक कारणामे करणाऱ्या मोसादची स्थापना 13 डिसेंबर, 1949 मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री डेविड बेन-गूरियन यांच्या सल्ल्याने करण्यात आली होती.  गुप्त माहिती गोळा करणे, गुप्त ऑपरेशन चालवणे आणि दहशतवादाविरोधात लढणे असे काम मोसाद करत असते. देशाच्या कायद्यात मोसादचा उद्देश, भूमिका, मिशन, पॉवर किंवा बजेटसंबंधी काहीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे मोसाद ही पूर्णपणे केवळ पंतप्रधानांनाच उत्तरदायी असते. सध्या या संस्थेचे प्रमुख आहेत योसी कोहेन.  चारी दिशांनी शत्रूंनी वेढलेल्या या छोट्या देशाला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी डोळ्यात तेल टाकून सतर्क राहावं लागतं. शत्रूने वार करण्याआधीच आपली चाल चालावी लागते. त्याचमुळे मोसाद ही संस्था आंत्यतिक क्रूर बनल्याचं सांगितलं जातं. मोसादने मिळवलेल्या यशामुळेच या गुप्तचर संस्थेचा जगभरात बोलबाला आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Iranian scientists killed by Israeli mosad