esakal | इराणच्या जहाजावर हल्ला; अनेक वर्षांपासून नांगर टाकून होतं उभा
sakal

बोलून बातमी शोधा

iran

इराणचे एमव्ही साविझ हे मालवाहतूक जहाज अनेक वर्षांपासून लाल समुद्रात आहे. यावरून सौदी अरेबियाने अनेकवेळा टीका केली आहे.

इराणच्या जहाजावर हल्ला; अनेक वर्षांपासून नांगर टाकून होतं उभा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

दुबई -  येमेनच्या जवळ लाल समुद्रात गेल्या अनेक वर्षांपासून नांगर टाकून उभ्या असलेल्या इराणच्या मालवाहतूक जहाजावर हल्ला झाल्याचा दावा विदेशी माध्यमांनी केला असून इराणच्या सरकारी वृत्त माध्यमांनीही याची दखल घेतली आहे. या जहाजाचा वापर इराणच्या सैन्याचा तळ म्हणून केला जात असल्याचे समजते. 

इराणचे एमव्ही साविझ हे मालवाहतूक जहाज अनेक वर्षांपासून लाल समुद्रात आहे. यावरून सौदी अरेबियाने अनेकवेळा टीका केली आहे. या जहाजाचा वापर करून येमेनमधील हौथी बंडखोरांना इराण शस्त्रपुरवठा करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. इराणने बंडखोरांशी संबंध असल्याचे अनेकदा नाकारले असले तरी या बंडखोरांकडून जप्त केलेल्या शस्त्रांचा स्रोत इराणमध्येच असल्याचे उघड झाले आहे. अशा परिस्थितीत या जहाजावरच हल्ला झाला असून तो इस्राईलने केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

हे वाचा - इंडोनेशियात भूस्खलन, पुरामुळे आतापर्यंत 126 लोकांचा मृत्यू

जहाजावर स्फोट झाल्याचे विदेशी माध्यमांनी म्हटले आहे. इराण आणि सहा देशांमध्ये अणुकराराची अंमलबजावणी करण्याबाबत सध्या व्हिएन्ना येथे चर्चा सुरु असून अमेरिका या करारात पुन्हा सामील होण्याचा निर्णय घेऊ शकते. जहाजावरील हल्ल्याचा या चर्चेवर परिणाम होणे शक्य आहे. याकराराला इस्राईलचा तीव्र विरोध आहे.

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संसदेतील ताज्या भाषणात विरोध केला होता. इस्राईलच्या अस्तित्वाला आणि जागतिक सुरक्षेलाही इराणचा धोका असल्याने या देशाबरोबर कोणताही करार केला जाऊ नये, असे आवाहन त्यांंनी केले होते.

loading image