लादेनबाबतची माहिती 'आयएसआय'कडे नव्हती : जनरल पेट्रस

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जुलै 2019

पाकिस्तानने मदत केल्यामुळेच अमेरिका लादेनचा खात्मा करू शकली, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी (ता. 22) अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी केले होते.

न्यूयॉर्क : पाकिस्तानची गुप्तचर संस्था 'आयएसआय'ला ओसामा बिन लादेनचा ठावठिकाणा माहिती नव्हता, असे स्पष्टीकरण अमेरिकेची गुप्तचर संस्था 'सीआयए'चे माजी संचालक जनरल डेव्हिड पेट्रस यांनी बुधवारी (ता.24) दिले. लादेनबाबतचा पाकिस्तानचा दावा चुकीचा आहे, असेही ते म्हणाले. 

पाकिस्तानने मदत केल्यामुळेच अमेरिका लादेनचा खात्मा करू शकली, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी (ता. 22) अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी केले होते. त्यामुळे पेट्रस यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. खान हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. 
भारतीय उच्चायुक्तालयाने भारत-प्रशांत विषयावर पेट्रस यांच्या व्याखानाचे आयोजन केले होते. या व्याख्यानानंतर माध्यमांशी संवाद साधताना पेट्रस यांनी पाकिस्तानचा दावा खोडून काढला.

लादेनबाबत पाकिस्तानला काहीही माहिती नव्हती, तसेच पाकिस्तानने लादेनला दडवून ठेवले होते, अशी कुठलीही माहिती आमच्यापर्यंत आली नव्हती. त्यामुळे आयएसआयमुळेच लादेन अमेरिकेच्या हाती लागला, हा दावा चुकीचा आहे, असे पेट्रस यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ISI did not have information about Osama Bin Laden says General Petraeus