श्रीलंकेतील साखळी बाँबस्फोटांमागे 'इसिस'; बळींची संख्या 321 वर

वृत्तसंस्था
बुधवार, 24 एप्रिल 2019

लंकेला हादरविणाऱ्या भीषण साखळी बॉंबस्फोटांची जबाबदारी इसिसने स्वीकारली असल्याची माहिती इसिसशी संबंधित ऍमॅक या वृत्तसंस्थेने दिली आहे.

कोलंबो (वृत्तसंस्था) : श्रीलंकेला हादरविणाऱ्या भीषण साखळी बॉंबस्फोटांची जबाबदारी इसिसने स्वीकारली असल्याची माहिती इसिसशी संबंधित ऍमॅक या वृत्तसंस्थेने दिली आहे. मात्र, जबाबदारी स्वीकारताना इसिसकडून कुठलेही पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत.
 
या साखळी बॉंबस्फोटांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या मंगळवारी 321 पर्यंत पोचली असून, 500 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या बॉंबस्फोटांमागे श्रीलंकेतील स्थानिक नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) या कट्टरवादी इस्लामिक गटाचा हात असल्याची शक्‍यता सरकारकडून यापूर्वीच वर्तविण्यात आली होती.
 
रविवारी ईस्टर संडेच्या दिवशी प्रार्थना सुरू असताना कोलंबो आणि परिसरातील तीन प्रसिद्ध चर्चमध्ये एकापाठोपाठ बॉंबस्फोट झाले होते. त्यानंतर तीन पंचतारांकित हॉटेलांना लक्ष्य करत तेथेही बॉंबस्फोट घडवून आणण्यात आले होते. तसेच, सोमवारीही एक स्फोट झाला होता. श्रीलंकेतील ख्रिश्‍चन समुदाय आणि विदेशी नागरिकांना लक्ष्य करत हा आत्मघाती दहशतवादी हल्ला घडवून आणला होता.

मसाल्याचा व्यापार करणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या दोन मुलांचा आत्मघाती दहशतवाद्यांमध्ये समावेश होता, अशी माहिती समोर आली आहे. हे दोघेही "एनटीजे' या कट्टरवादी मुस्लिम गटाशी संबंधित होते. 

कोलंबोत 'हाय अलर्ट' 
स्फोटकांचा साठा असलेला एक कंटेनर आणि एका मोटारीचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती कोलंबो बंदराच्या सुरक्षा संचालकांनी आज दिली. त्यानंतर कोलंबोमध्ये मंगळवारी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. स्फोटकांनी भरलेली दोन वाहने कोलंबोच्या दिशेने येत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिसांकडून ठिकठिकाणी शोध मोहीम उघडण्यात आली असल्याचे सांगणयात आले. 

मृतांमध्ये दहा भारतीयांचा समावेश 
श्रीलंकेतील साखळी बॉंबस्फोटांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांची संख्या दहावर पोचली आहे. दोन भारतीयांचा या स्फोटांमध्ये मृत्यू झाल्याची माहिती आज प्राप्त झाल्याचे कोलंबोतील भारताच्या उच्चायुक्तांनी स्पष्ट केले. ए. मारेगौडा आणि एच. पुट्टराजू अशी या दोघांची नावे आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्‌विटरवर दिली. हे दोघेही कर्नाटकमधील असून, ते रविवारपासून बेपत्ता होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ISIS is Mastermind of Sri lankas Bomb Blast