esakal | भारतात जाऊ नका! इस्रायलचा नागरिकांना आदेश, 7 देशांमध्ये प्रवासावर निर्बंध

बोलून बातमी शोधा

भारतात प्रवास करू नका! इस्रायलचे नागरिकांना आदेश

कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यानं खबरदारी म्हणून भारतासह सहा देशांमध्ये प्रवास करण्यावर निर्बंध घातले आहेत.

भारतात प्रवास करू नका! इस्रायलचे नागरिकांना आदेश
sakal_logo
By
टीम ई सकाळ

जेरुसलेम : भारतात कोरोनाचा उद्रेक झाला असून गेल्या आठवड्याभरात दरदिवशी तीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडत आहेत. तर 3 हजारांहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. भारतातील कोरोनाच्या उद्रेकाचा धसका जगभरातील अनेक देशांनी घेतला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता इस्रायलनेसुद्धा त्यांच्या नागरिकांना भारतात प्रवासावर बंदी लागू केली आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यानं खबरदारी म्हणून भारतासह सहा देशांमध्ये प्रवास करण्यावर निर्बंध घातले आहेत.

इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालय आणि आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. त्यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितलं की, इस्रायलच्या नागरिकांना युक्रेन, ब्राझील, इथियोपिया, दक्षिण आफ्रिका, भारत, मेक्सिको आणि तुर्कस्तान या देशांमध्ये प्रवास करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. तीन मेपासून 16 मे पर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.

हेही वाचा: Corona Update : 24 तासांत 3.92 लाख नवीन रुग्ण

इस्रायलच्या नागरिकांना या देशांमध्ये प्रवास करायचा असेल तर काही अटी आहेत. इतर देशांमधील नागरिकांना या देशात प्रवास करण्यासाठी तिथे कायमचं राहण्याची योजना असायला हवी. हा आदेश त्या लोकांसाठी नाही जे प्रवास करत असताना विमानतळावर 12 तासांपर्यंत अडकून पडले आहेत.

इस्रायलमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, आरोग्य मंत्रालयाने असा प्रस्ताव दिला आहे की, या सात देशांमधून परतणाऱ्या व्यक्तींना दोन आठवड्यासाठी विलगीकरणात ठेवलं जाईल. त्यांनी कोरोनाची लस घेतली असली किंवा कोरोनामुक्त झाले असले तरीही विलगीकरणात राहणं बंधनकारक असेल. ज्यांची कोरोना चाचणी सलग दोन वेळा निगेटिव्ह आलीय त्यांनाही 10 दिवस विलगीकरणात रहावं लागेल.