इस्राईलमध्ये दुसऱ्यांदा लॉकडाउन लागू; देशातील रुग्णसंख्या वाढल्याने निर्णय

पीटीआय
Wednesday, 16 September 2020

देशात तीन आठवड्यासाठी लॉकडाउन लागू असणार असून रुग्णांची संख्या आणखी वाढल्यास त्यास मुदतवाढही देण्याचा निर्णय होऊ शकतो. दुसऱ्यांदा लॉकडाउन लागू करणारा इस्राईल हा युरोपातील पहिला देश ठरला. 

जेरुसलेम - इस्राईलमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी देशात दुसऱ्यांदा लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १८ सप्टेंबरपासून लॉकडाउन लागू होणार आहे. देशात तीन आठवड्यासाठी लॉकडाउन लागू असणार असून रुग्णांची संख्या आणखी वाढल्यास त्यास मुदतवाढही देण्याचा निर्णय होऊ शकतो. दुसऱ्यांदा लॉकडाउन लागू करणारा इस्राईल हा युरोपातील पहिला देश ठरला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले, की लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय मला इच्छा नसतानाही घ्यावा लागत आहे. लॉकडाउन म्हणजे मौजमजा करण्यासाठी दिलेली सुटी नाही. ही सुटी सर्वांना वाचवण्यासाठी  दिली आहे. आपण घरातच कुटुंबासमवेत राहवे. लॉकडाउनच्या नियमांचे पालन केल्यास कोरोनावर विजय शक्य आहे, असा विश्‍वास नेतान्याहू यांनी व्यक्त केला. इस्राईलने प्रारंभीच्या काळात लॉकडाउन लागू केल्याने कोरोनावर चांगले नियंत्रण मिळवले होते. परंतु कालांतराने स्थिती बिघडत गेली. यानंतर नेतान्याहू यांच्याविरोधात आंदोलन सुरू झाले आणि लोक रस्त्यावर उतरले. परिणामी कोरोना संसर्गाचा फैलाव वाढला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नाराज मंत्र्याचा राजीनामा
इस्राईलच्या एका मंत्र्याने देशव्यापी लॉकडाउनच्या निर्णयावरून नाराज होत मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. महामारीचा उद्रेक झाल्यानंतर सुरवातीच्या काळात आरोग्यमंत्री राहिलेले आणि आता घरकुल मंत्री असणारे याकोव्ह लित्झमन यांनी लॉकडाउनच्या निर्णयावर टीका केली आणि यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागेल, असे म्हटले आहे. ज्यू लोकांचे नववर्ष जवळ आलेले असताना लॉकडाउन लागू केल्याने ते नाराज आहेत. ते म्हणाले की, दरवर्षी नववर्षानिमित्त हजारोच्या संख्येने प्रार्थनागृहात जाणाऱ्या ज्यू नागरिकांसमवेत मी आहे. परंतु यंदा लॉकडाउनमुळे त्यांना जाता येणार नाही. येत्या १८ ते २० सप्टेंबरदरम्यान ज्यू नागरिकांचे नववर्ष आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दीड लाख बाधित
इस्राईलची लोकसंख्या ९० लाख असून त्यापैकी १ लाख ५५ हजार नागरिक बाधित झाले आहेत. इस्राईलमध्ये १११९ जणांचा मृत्यू झाला आहे. लोकसंख्या आणि बाधितांची संख्या याचे प्रमाण पाहता इस्राईल हा सर्वांत कोरोनाबाधित म्हणून ओळखला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: israel first country in world to impose second lockdown