दलाई लामांच्या निवडीतही अमेरिकेने नाक खुपसले; काय केली मागणी? 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

- तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांचा वारसदार ठरविण्याचा नाही चीनला अधिकार

वॉशिंग्टन : तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांचा वारसदार ठरविण्याचा चीनला अधिकार नसून, संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी यामध्ये लक्ष घालावे, असे आवाहन अमेरिकेने आज केले आहे. तिबेट हा आमचाच भाग असून, दलाई लामा यांचा वारसदारही आम्हीच ठरविणार असल्याचा चीनचा दावा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

येथे एका पत्रकार परिषदेत अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य विभागाचे राजदूत सॅम्युएल ब्राऊनबॅक यांनी अमेरिकेची भूमिका मांडली. "दलाई लामा यांना मानणारे आणि चीनमध्ये न राहणारे अनेक लोक आहेत. ते जगातील एक प्रसिद्ध आणि आदरणीय धार्मिक नेते आहेत. त्यामुळेच त्यांचा वारसदार हा तिबेटी लोकांची श्रद्धा असलेल्या प्रक्रियेनुसारच होणे आवश्‍यक आहे. यामध्ये चीनने हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. संयुक्त राष्ट्रांसारख्या संघटनांनी यामध्ये लक्ष घालावे,'' असे ब्राऊनबॅक यांनी सांगितले. ब्राऊनबॅक यांनी काही दिवसांपूर्वीच भारतात धर्मशाला येथे वास्तव्यास असलेल्या दलाई लामा यांची भेट घेतली होती. 

ताज्या बातम्या

1959 मध्ये चीनने तिबेटचा ताबा घेतल्यापासून दलाई लामा हे भारतात विजनवासात राहत आहेत. दलाई लामा हे फुटीरतावादी असून, ते तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी कारवाया करत असल्याचा चीनचा आरोप आहे. दलाई लामा यांच्या वारसदाराची निवड पारंपरिक पद्धतीने नव्हे, तर चीन सरकारच्या आदेशानुसार होईल, असा चीनचा दावा आहे. मात्र, अमेरिकेचा याला विरोध आहे. "दलाई लामा हे वयामुळे आता पूर्वीसारखे प्रवास करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा वारसदार निवडणे आवश्‍यक आहे. त्यासाठी तिबेटी नागरिकांना मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनांनी पुढे यावे. हा धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा आहे,' असे आवाहन ब्राऊनबॅक यांनी केले आहे. 

दलाई लामा निवडण्याचा तिबेटींना हक्क

"दलाई लामा यांचा पुनर्जन्म होतो, यावर आमचा 800 वर्षांपासून विश्‍वास आहे. त्यामुळे या प्रक्रियेनुसारच दलाई लामा यांच्या वारसदाराची निवड करण्याचा आम्हाला हक्क आहे,' असा दावा सेंट्रल तिबेटियन ऍडमिनिस्ट्रेशनचे अध्यक्ष लोबसंग सांग्ये यांनी आज अमेरिकेतील एका कार्यक्रमात केला. दलाई लामा म्हणून निवड झालेल्या व्यक्तीला चीन सरकारची मान्यता असायला हवी, या चीनच्या दाव्याला त्यांनी विरोध केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Its Not Chinas Right US Envoy On Deciding Dalai Lamas Successor