esakal | 'अलीबाबा'चे जॅक मा सापडले! गेल्या 2 महिन्यांपासून होते रहस्यमयरित्या बेपत्ता
sakal

बोलून बातमी शोधा

Jack ma

जगातील तिसरी सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि अलीबाबा समूहाचे मालक जॅक मा मागील दोन महिन्यांपासून बेपत्ता होते.

'अलीबाबा'चे जॅक मा सापडले! गेल्या 2 महिन्यांपासून होते रहस्यमयरित्या बेपत्ता

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : जगातील तिसरी सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि अलीबाबा समूहाचे मालक जॅक मा मागील दोन महिन्यांपासून बेपत्ता होते. ते आता समोर आले आहेत. बुधवारी जॅक मा यांनी व्हिडीओ कॉन्फरंन्सिगच्या माध्यमातून ग्रामीण भागातील 100 शिक्षकांशी बातचित केली. गेल्या ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच जॅक मा सार्वजनिक रित्या समोर आले आहेत. चीनमधील तंत्रज्ञान उद्योगावर वर्चस्व असणारे जॅक मा चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर झालेल्या वादानंतर मागील दोन महिन्यांपासून दिसलेच नव्हते. जॅक मा यांनी मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये शांघाय येथे झालेल्या एका कार्यक्रमात सरकारी बँकांवर तिखट शब्दांत टीका केली होती. 

हेही वाचा - -14 डिग्रीच्या पाण्यात बुडाले रशियाचे राष्ट्राध्यक्ष; व्लादिरमी पुतीन यांची बर्फाळ पाण्यात डुबकी
मीडियामधील बातम्यांमध्ये अशी चर्चा होती की, आपल्या बँकींग प्रणालीवर कडवट टीका केल्याने चीनच्या सरकारने जॅक मा यांना नजरबंद केलं आहे. तसेच त्यांच्या एकूण कारभारावर नियंत्रण आणण्याची तयारी केली आहे. त्यानंतर जॅक मा आपला टीव्ही शो 'आफ्रिका बिझनेस हिरोज'मधून नोव्हेंबरपासून रहस्यमयरित्या बेपत्ता झाले होते. इतकेच नव्हे तर या शोमधून त्यांचा फोटोही हटवण्यात आला होता.  जॅक मा सिड्यूलच्या वादामुळे आता परीक्षकांच्या पॅनला हिस्सा नसतील, असे अलीबाबा समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले होते. यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्याबद्दल चित्रविचित्र असे दावे-प्रतिदावे करण्यात येत होते.

ऑनलाईन शिक्षकांना केलं संबोधित
फाऊंडेशनने म्हटलं की बुधवारी ऑनलाईन ऍन्यूअल रुरल टीचर इनिशिएटीव्ह प्रोग्राममध्ये ते सहभागी झाले. अलीबाबा ग्रुपने देखील या कार्यक्रमात ते सहभागी झाल्याची पुष्टी केली आहे. 50 सेकंदांच्या एका व्हिडीओत जॅक मा एका खोलित बसून बोलताना दिसत आहेत. मात्र, या व्हिडीओमधून हे स्पष्ट होत नाहीये कि ते कुठे आहेत? जॅक मा यांनी रुरल टीचर्स अवार्ड प्राप्त झालेल्या शिक्षकांना संबोधित केलं. आपल्या भाषणात जॅक मा यांनी म्हटलं की, कोरोना संकटामुळे आपण सान्यामध्ये भेटू शकलो नाही. हे संकट संपल्यानंतर आपण पुन्हा सान्याला भेटू. जॅक मा यांचा ठिवठिकाणा अद्याप समजला नाहीये. त्यांच्या बेपत्ता होण्याबाबत चीनच्या सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव आहे. या दबावाला कमी करण्यासाठीच त्यांना याप्रकारे लोकांसमोर आणलं गेल्याचं म्हटलं जातंय.

जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी आदर्श असलेल्या जॅक मा यांनी जागतिक बँकिंग नियमांना 'ज्येष्ठ लोकांचा क्लब' असल्याचा टोला लगावला होता. त्यांच्या या भाषणानंतर चीनमधील सत्तारुढ कम्युनिस्ट पक्ष संतापला होता. जॅक मा यांची टीका ही कम्युनिस्ट पक्षावरील टीका समजण्यात आली होती. त्यानंतर जॅक मा यांच्यामागे शुक्लकाष्ट लागले आणि त्यांच्या उद्योगांवर अनेक बंधने लादण्यास सुरुवात करण्यात आली.