प्रख्यात अर्थतज्ज्ञ जेनेट येलेन बनल्या अमेरिकेच्या पहिल्या महिला अर्थमंत्री

jenet yelen.png
jenet yelen.png

वॉशिंग्टन- प्रख्यात अर्थतज्ज्ञ जेनेट येलेन यांनी अमेरिकेच्या अर्थमंत्री पदाची शपथ घेतली आहे. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी त्यांना शपथ दिली. येलेन या अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला अर्थमंत्री बनल्या आहेत. सोमवारी अमेरिकन सिनेटने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. त्याचबरोबर सिनेटने मंगळवारी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे दिर्घकाळापासून सहकारी राहिलेले अँटोनी ब्लिंकन यांना पुढील परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावासही मंजुरी दिली आहे. 

येलेन (74) यापूर्वी अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर होत्या. त्यांनी 2014 ते 2018 या काळात फेडरल बँकेचे नेतृत्त्व केले आहे. सोमवारी सिनेटने 84 विरुद्ध 15 मतांनी येलेन यांना अर्थमंत्री म्हणून मान्यता दिली होती. आता येलेन यांच्यासमोर कोरोना महामारीमुळे बिघडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी आणण्याचे आव्हान आहे. 

तत्पूर्वी, अँटोनी ब्लिंकन यांनी सिनेटने मंगळवारी परराष्ट्र मंत्री होण्यास मंजुरी दिली. ब्लिंकन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या मंत्रिमंडलातील चौथे सदस्य बनले आहेत. त्यांच्या नियुक्तीला सिनेटने मंजुरी दिली आहे. ब्लिंकन आणि येलेन यांच्याशिवाय सिनेटने राष्ट्रीय सतर्कता विभागाच्या संचालकपदासाठी एव्रिल हेनेस आणि संरक्षण मंत्री पदासाठी लॉयड ऑस्टिन यांच्या नावाला मंजुरी दिली. 

अमेरिकेला कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. आतापर्यंत अमेरिकेत यामुळे 4.20 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत अडीच कोटींहून अधिक जण बाधित झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी या महामारीतून अर्थव्यस्था रुळावर येण्यासाठी 1.9 हजार अब्ज डॉलरच्या पॅकेजचा प्रस्ताव दिला आहे. 

अमेरिकन सिनेटमध्ये सत्ताधारी डेमोक्रॅटिक आणि विरोधी रिपब्लिकन दोन्ही पक्षाचे 50-50 सदस्य आहेत. येलेन यांनी ब्राऊन आणि येल विद्यापीठातून पदवी घेतली आहे. त्यांनी जगातील अनेक प्रतिष्ठित विद्यापीठात अर्थशास्त्र शिकवले आहे. जागतिक आर्थिक संकटामुळे कोसळलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी फेडरल बँकेच्या गव्हर्नर असताना यांनी केलेल्या कार्यासाठी येलेन यांना ओळखले जाते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com