शिंजो अबे यांचा उत्तराधिकारी ठरला, जाणून घ्या कोण होणार जपानचे पंतप्रधान

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 14 September 2020

काही दिवसांपूर्वी शिंजो अबे यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पुढील पंतप्रधान कोण, असा प्रश्न अनेकांना पडला होता. 

टोकीओ- जपानच्या सत्ताधारी पक्षाने सोमवारी मुख्य मंत्रिमंडळ सचिव योशिहिडे सुगा यांना त्यांचा नवा नेता म्हणून निवडलं आहे. त्यामुळे ते शिंजो अबे यांच्यानंतर पंतप्रधान होतील, हे आता निश्चित आहे. काही दिवसांपूर्वी शिंजो अबे यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पुढील पंतप्रधान कोण, असा प्रश्न अनेकांना पडला होता. 

सुगा यांची निवड सहज होती. त्यांना सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे सभासद आणि स्थानिक प्रतिनिधींच्या एकूण ५३४ मतांपैकी ३७७ मते मिळाली.  सुगा यांनी प्रतिस्पर्धी माजी संरक्षणमंत्री शैगेरु इशिबा आणि एलटीडी पॉलिसी प्रमुख फुमीओ किशीडा यांना सहजरित्या मागे टाकले. इशिबा हे नागरिकांमध्ये प्रसिद्ध आहेत, पण त्यांना पक्षामधून पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. दुसरीकडे, अबे यांचे उत्तराधिकारी म्हणून किशिदा यांची निवड होईल, असं सांगितलं जात होतं. मात्र, त्यांना केवळ ८९ मते मिळाली. 

इस्त्राईलमध्ये तीन आठवड्यांचा लॉकडाऊन; पंतप्रधानांनी केली घोषणा

एलटीडी पक्षाच्या सभासदांनी योशिहिडे सुगा यांना बहुमताने आपला नेता म्हणून निवडला असल्याने, बुधवारी संसदेत होणाऱ्या मतदानामध्येही त्यांचा विजय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते जपानचे पुढचे पंतप्रधान होतील हे जवळजवळ निश्चित आहे. शिंजो अबे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपला राजीनामा दिला होता. प्रकृती सतत बिघडत असल्याने त्यांचे प्रशासनाकडे दुर्लक्ष होत होते.  अबे सर्वाधिक काळ पंतप्रधान असणारे जपानचे नेते ठरले आहेत. 

कोण आहेत सिगा?

योशिहिडे सिगा (वय ७१) हे सरकारचे सल्लागार आणि प्रवक्ते आहेत. शिंजो अबेंची पॉलिसी पुढे घेऊन जाण्यावर सिगा विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले जाते. सिगा यांचे वडील स्ट्रॉबेरीची शेती करायचे. त्यांचे बालपण जपानच्या उत्तरेतील अकिता प्रांतात गेले आहे.  शेतकऱ्याचा मुलगा असल्याने सिगा यांना ग्रामीण प्रश्नांची चांगली जाण आहे. पंतप्रधान झाल्यानंतर ग्रामीण प्रश्न त्यांच्या अजेंड्यावर राहणार आहेत. असे असले तरी त्यांची वैयक्तिक विचारधारा स्पष्ट नाही. ते सर्वसाधारण मध्यममार्गी असल्याचं सांगितलं जातंय.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Japan Ruling Party Elects Yoshihide Suga As PM Successor