आफ्रिदीने क्रिकेटकडे लक्ष द्यावे: जावेद मियाँदाद

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

कराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने काश्मीरबाबत विधान करायला नको होते. क्रिकेटपटूंनी संवेदनशील राजकीय विषयांवर भाष्य करण्याऐवजी खेळावर लक्ष द्यावे, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद याने म्हटले आहे.

कराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने काश्मीरबाबत विधान करायला नको होते. क्रिकेटपटूंनी संवेदनशील राजकीय विषयांवर भाष्य करण्याऐवजी खेळावर लक्ष द्यावे, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद याने म्हटले आहे.

काश्‍मीरबाबत सातत्याने कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला त्यांचाच माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याने घरचा अहेर दिला होता. ब्रिटनच्या संसदेत विद्यार्थ्यांपुढे बोलताना आफ्रिदीने म्हणाला होता, "पाकिस्तानला काश्‍मीर नको आहे, ते भारतालाही देऊ नका. काश्‍मिरींना स्वतंत्रच राहू द्या, किमान मानवता जिवंत राहील. कोणाला मरू देऊ नका. पाकिस्तानला त्यांचे चार प्रांत सांभाळता येत नाहीत. "इन्सानियत'शिवाय मोठी गोष्ट कोणती आहे?'' त्याच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आफ्रिदी यांची ही टीका म्हणजे पंतप्रधान इम्रान खान यांना टोला मानला जातो. काश्‍मिरातील स्थिती गंभीर झाली असून, संयुक्त राष्ट्रसंघाच्या हस्तक्षेपाची गरज असल्याचे ट्‌विट इम्रान खान यांनी यंदाच्या एप्रिलमध्ये केले होते आणि त्यानंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला होता.

पत्रकारांशी बोलताना जावेद मियाँदाद म्हणाला, 'आफ्रिदीने जे काही विधान केले आहे, ते किंवा त्या पद्धतीचे विधान त्याला शोभत नाही. त्याने अशी विधानं करणे टाळले पाहिजे. क्रिकेटपटूंनी संवेदनशील राजकीय विषयांवर भाष्य करणे टाळून क्रिकेटकडे लक्ष द्यायला हवे. क्रिकेटपटूंनी निवृत्तीनंतर आपल्याला जमेल असा करियरचा नवा पर्याय निवडावा.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Javed Miandad advises cricketers to avoid voicing opinions on political issues