फूट नको, एकता हवी; बायडेन यांचे आवाहन

पीटीआय
Monday, 9 November 2020

अत्यंत चुरशीच्या झालेल्या अध्यक्षपदाच्या लढतीत रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केल्यानंतर नियोजित उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासह बायडेन यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला.

वॉशिंग्टन - ज्यांना फूट नको, एकता हवी आहे; पक्षाच्या दृष्टीकोनातून देशातील राज्यांची विभागणी न करता ‘युनायटेड स्टेट्‌स’ पहायचे आहे, त्या सर्व अमेरिकी नागरिकांचा मी अध्यक्ष होईन , असे आश्‍वासन अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज दिले. देशात प्रचंड ध्रुवीकरण झाले असून हे ‘दडपशाहीचे युग’ तातडीने संपविण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले. 

अत्यंत चुरशीच्या झालेल्या अध्यक्षपदाच्या लढतीत रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केल्यानंतर नियोजित उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासह बायडेन यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला. आपल्या मूळ गावी, डेलावर राज्यातील विलिंग्टन या गावी जनतेसमोर भाषण केले. अध्यक्षपदासाठी केलेल्या तिसऱ्या प्रयत्नात ते यशस्वी ठरले. त्यांनी १९८८ आणि २००८ मध्ये उमेदवारीसाठी पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. अमेरिकेतील जनतेने प्रचंड पाठबळ दिल्याबद्दल बायडेन यांनी जनतेचे आभार मानले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बायडेन म्हणाले की,‘‘मी भेदभाव न करता सर्वच अमेरिकी जनतेचा अध्यक्ष बनण्याचा प्रयत्न करेन. माझ्यावर विश्‍वास व्यक्त केल्याबद्दल मी जनतेचा ऋणी आहे. मला मतदान केलेल्यांबरोबरच ज्यांनी मत दिले नाही, त्यांच्या विकासासाठीही मी काम करेन. सध्याचा राक्षसी काळ संपण्यास आता सुरुवात झाली आहे.’’ बायडेन हे विजयी झाले असले तरी ट्रम्प यांनी मात्र अद्याप आपला पराभव स्वीकारलेला नाही. अनेक राज्यांमध्ये निकालाविरोधात याचिका दाखल करण्याचा इरादा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांच्या नाराज समर्थकांशीही बायडेन यांनी संवाद साधला. ‘तुमची नाराजी मी समजू शकतो. मी स्वत: पराभवाची चव चाखली आहे. पण आता, आपण एकमेकांना संधी देऊया. ही वेळ अमेरिकेला सशक्त करण्याची आहे,’ असे आवाहन बायडेन यांनी केले. 

सुष्ट आणि दुष्ट यांच्या सातत्याच्या लढाईतूनच अमेरिकेची निर्मिती झाली आहे. आता सुष्ट शक्तींना ताकद देण्याची  वेळ आहे. सर्व जग आपल्याकडे  आशेने पहाते आहे. आपल्याला  अमेरिकेचा आत्मा परत  मिळवायचा आहे. 
- ज्यो बायडेन, नियोजित अध्यक्ष, अमेरिका

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही सत्याची निवड केली : कमला हॅरिस
नियोजित उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनीही जनतेशी संवाद साधला. ‘तुम्ही आशा, एकता, सौजन्य आणि सत्याची निवड केली आहे,’ असे सांगताना हॅरिस यांनी ज्यो बायडेन यांची स्तुती केली. ‘काही तरी गमावण्याचा अनुभव असल्यामुळे बायडेन यांच्यासमोर विशिष्ट लक्ष्य आहे, देशाचा गौरव पुन्हा मिळवून देण्यात ते आपल्या सर्वांना मदत करतील. जनतेने आज नवा इतिहास घडवला आहे,’ असे हॅरिस म्हणाल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Joe Biden appeal unity is needed