आता वेळ चांगले काम करण्याची;  कमला हॅरिस यांचे आवाहन

पीटीआय
Friday, 21 August 2020

भाषणात त्यांनी विद्यमान डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारभारावर टीका केली.सरकारमध्ये अनागोंदीचे वातावरण असल्याने आता आपल्याला अधिक चांगले काम करून अमेरिकेला पूर्वपदावर आणायचे आहे,असे आवाहन त्यांनी केले. 

विल्मिंग्टन - भारतीय वंशाच्या सिनेटर यांनी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी स्वीकारून इतिहास रचला. या पदासाठी त्यांची गेल्या आठवड्यात निवड झाल्यानंतर आज त्यांच्या स्वीकृतीनंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. सरकारमध्ये अनागोंदीचे वातावरण असल्याने आता आपल्याला अधिक चांगले काम करून अमेरिकेला पूर्वपदावर आणायचे आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळालेल्या कमला हॅरिस (वय ५५) पहिल्या भारतीय वंशाच्या आणि पहिल्या कृष्णवर्णीय व्यक्ती बनल्या आहेत. अध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बिडेन यांच्या डेल्वर येथील विल्मिंग्टन या मूळ गावी झालेल्या सभेत हॅरिस यांनी डेमोक्रॅटिक पक्षाने जाहीर केलेली उमेदवारी अधिकृतरित्या स्वीकारली. यावेळी त्या म्हणाल्या, ‘‘सरकारमधील अनागोंदीमुळे आपण मागे पडत आहोत. या अकार्यक्षमतेमुळे आपल्या मनात भय निर्माण झाले आहे. आता आपण ही परिस्थिती चांगल्या प्रकारे बदलू शकतो. असा बदल घडवून आणणारा आणि चांगले काम करणारा अध्यक्ष आपण आता निवडायला हवा.’’ हा देश कोरोना आणि वंशद्वेष यामुळे दुभंगला आहे. वंशद्वेषावर कोणतीही लस नाही. त्यामुळे आपण सत्तेत आल्यास वंशद्वेष दूर करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले. ट्रम्प यांच्या अपयशामुळे अनेकांचा बळी गेला असून ते संकटांचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करतात, अशी टीकाही त्यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आईची आठवण आणि ‘चिटी’चा उल्लेख
कमला हॅरिस यांनी यांची आई भारतीय होती. आपल्या भाषणात त्यांनी आईचा उल्लेख केला. ‘दुसऱ्यांची सेवा केल्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो, असे मला माझ्या आईने शिकविले आहे. आजचा दिवस बघायला ती हवी होती,’ असे हॅरिस म्हणाल्या. हॅरिस यांच्या आईचे २००९ मध्ये कर्करोगाने निधन झाले. भाषणादरम्यान त्यांनी कुटुंबाला असलेले महत्त्वही सांगितले. माझ्या कुटुंबात माझे काका, काकू आणि ‘चिटी’ (मावशी) यांचाही समावेश होतो. त्यांच्या या तमिळ भाषेतील शब्दामुळे ट्वीटरवर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नेत्यांची ट्रम्प यांच्यावर आगपाखड
डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आज डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली. ट्रम्प यांच्यामुळे अल्पसंख्याकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाल्याचे माजी अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले, तर हिलरी क्लिंटन यांनी रिपब्लिकन पक्षाला हटविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे आवाहन केले. हॅरिस या अत्यंत योग्य उमेदवार असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान, कधीही टीका न करणाऱ्या ओबामा यांनी टीका केल्याने चिडलेल्या ट्रम्प यांनी, माझ्या प्रचार मोहिमेवर ओबामा यांनी हेरगिरी केली होती, असा आरोप केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kamala Harris become the first person of Indian descent nominated for the post of VP