पत्नीसाठी करिअरला रामराम! कमला हॅरिस यांच्या मदतीसाठी पती सोडणार नोकरी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

ऑगस्ट महिन्यात कमला हॅरिस यांना उप राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर डग्लस एमहाफ यांनी सुट्टी घेतली होती. पत्नीच्या निवडणूक प्रचारात त्यांनी मदत केली.

वॉशिंग्टन - अमेरिकेत उप राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस या विजयी झाल्या आहेत. त्यांच्या मदतीसाठी आता पती डग्लस एमहाफ यांनी नोकरी सोडण्याची घोषणा केली आहे. डग्लस एमहाफ यांना अमेरिकन मीडियाने जंटलमन असं म्हटलं आहे. एमहाफ व्यवसायाने वकील आहेत.

ऑगस्ट महिन्यात कमला हॅरिस यांना उप राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर डग्लस एमहाफ यांनी सुट्टी घेतली होती. पत्नीच्या निवडणूक प्रचारात त्यांनी मदत केली. निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या विजयानंतर ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यासोबत ते व्यासपीठावर दिसले होते.

युएसए टुडेने कमला हॅरिस आणि त्यांचे पती डग एमहाफ यांच्यावर एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यात म्हटलं आहे की, पत्नी कमला हॅरिस यांच्या मदतीसाठी एमहाफ येणार आहेत. ते कोणत्याही सरकारी पदावर किंवा सेवेत नाहीत. डामाउथ कॉलेजमधील प्राध्यापिका एला बेल म्हणतात की, याकडे एक आदर्श मॉडेल म्हणून पाहिलं पाहिजे. एमहाफ यांनी पत्नीसाठी करिअर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पत्नीला यशस्वी होताना बघायची त्यांची इच्छा आहे.'

हे वाचा - 152 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा अफगाणिस्तानमध्ये खात्मा; अफगाण सुरक्षा दलाची कारवाई

एका बाजुला कमला हॅरिस यांच्या पतीने वकीली सोडून पत्नीला मदत करण्याचा निर्णय घेतला असताना ज्यो बायडेन यांची पत्नी शिक्षिकेची नोकरी सोडणार का असाही प्रश्न उरला आहे. ज्यो बायडेन यांची पत्नी जिल यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की, फर्स्ट लेडी झाल्यानंतरही नोकरी करत राहणार आहे. ज्यो बायडेन उप राष्ट्रपती असताना जिल यांनी नोकरी सोडली नव्हती. आताही ती सोडणार नाही.

कमला हॅरिस आणि डग्लस एमहाफ यांची ओळख 2013 मध्ये झाली होती. एक वर्षाने 2014 मध्ये एमहाफ यांनी हॅरिस यांच्यासमोर लग्नचा प्रस्ताव ठेवला. त्याआधी डग्लस एमहाफ यांचा घटस्फोट झाला होता. पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुलं आहेत. 20 जानेवारीला ज्यो बायडेन राष्ट्राध्यक्षपदाची आणि कमला हॅरिस उप राष्ट्रपती पदाची शपथ घेतील.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kamala harris husbund quitt his job for help vice president elect