भारतीय वंशाच्या महिला उमेदवार शर्यतीत आघाडीवर 

वृत्तसंस्था
Friday, 31 July 2020

कमला प्रभावी कारकिर्दीमुळे नेहमीच शर्यतीत राहिल्या आहेत.सिनेटर म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली.मुख्य म्हणजे अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटीक उमेदवारीसाठीही त्या शर्यतीत होत्या.

वॉशिंग्टन - डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन यांनी उपाध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांना पसंती दिल्याची जोरदार शक्यता वर्तविली जात आहे. स्वतः बिडेन यांनी तसे स्पष्ट संकेत मिळण्याची व्यवस्था केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. 

वास्तविक उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत दर चार वर्षांनी विरोधकांची दिशाभूल करण्याचा डाव खेळला जात असतो. यावेळी मात्र या पदासाठीची दावेदारी नेहमीच्या तुलनेत जास्त आहे. त्यातच बिडेन कमला हॅरीस असे नाव असलेला कागद बिडेन यांनी नुकताच प्रदर्शित केला. त्यातच एका संकेतस्थळाने कमला यांची सरशी झाल्याचे वृत्तही प्रसिद्ध केले. 

उपाध्यक्षपदासाठी केवळ महिलेची निवड होईल असे बिडेन यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे उत्कंठा वाढली आहे. उपाध्यक्षपदासाठी महिला उमेदवाराची निवड होण्याची ही तिसरीच वेळ असेल. याआधी 1984 मध्ये जेराल्डीन फेरारो व 2008 मध्ये सारा पॅलीन या दोघींचा पराभव झाला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बिडेन यांनी सर्वेक्षणात रिपब्लिकन प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आघाडी घेतली आहे. त्यांनी प्रचाराची तीव्रता बरीच सौम्य ठेवली आहे. उपाध्यक्षपदासाठी प्रसार माध्यमांनी अनेक नावांचा उल्लेख केला आहे. त्यात सिनेटर एलिझाबेथ वॉरेन, बराक ओबामा यांच्या कार्यकालातील संयुक्त राष्ट्रांच्या राजदूत सुझन राइस यांच्यासह अंतिम टप्प्यात फ्लोरीडाच्या काँग्रेस सदस्य वॅल डेमींग्ज आणि सिनेटर टॅमी डकवर्थ अशा नावांची चर्चा सुरु आहे. 

कमला प्रभावी कारकिर्दीमुळे नेहमीच शर्यतीत राहिल्या आहेत. सिनेटर म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. मुख्य म्हणजे अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटीक उमेदवारीसाठीही त्या शर्यतीत होत्या. नंतर त्यांना बिडेन यांच्यासमोर माघार घ्यावी लागली. ब्लॅक लाईव्हज मॅटर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची निवड महत्त्वपूर्ण ठरू शकते, कारण त्यांचे पिता कृष्णवर्णीय, तर आई आशियाई आहे. 

आपला सहकारी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करू असे बिडेन यांनी म्हटले आहे. 

त्या कागदावरील मजकूर 
बिडेन यांच्या हातातील कागदावर कमला हॅरीस यांचा नामोल्लेख होता. त्याचवेळी काही वैशिष्ट्येही नमूद करण्यात आली होती. कुणाविरुद्ध मनात आकस धरीत नाहीत, प्रचार मोहिमेला विलक्षण मदत, कमालीचा आदर वाटणारी व्यक्ती असे मुद्दे बिडेन यांनी नमूद केले होते. 

वयाचा मुद्दा 
निवडून आल्यास 78 वर्षीय बिडेन हे इतिहासातील सर्वाधिक वयाचे अमेरिकी अध्यक्ष ठरतील. दुसऱ्या कार्यकालासाठी आपण कदाचित प्रयत्न करणार नाही असे त्यांनी यापूर्वीच सुचित्त केले आहे. त्यामुळे डमोक्रॅटीक पक्षाचा यावेळचा उपाध्यक्ष पुढील वेळी उमेदवारीसाठी भक्कम दावेदार ठरू शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kamala Harris of Indian descent leads