काश्मीर ना भारताचे ना पाकिस्तानचे: आफ्रिदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 एप्रिल 2019

आफ्रिदीचे आत्मचरित्र 'गेम चेंजर' नुकतेच प्रकाशित झाले आहे. आत्मचरित्रामध्ये क्रिकेटच्या रंजक कथा, विंग कमांडर अभिनंदन, काश्मीर, भारत-पाक आणि इम्रान खान सरकारवर यांसह विविध विषयावर लिहिले आहे.

लाहोर : भारत आणि पाकिस्तानमध्ये जम्मू-काश्मीरवरून वाद सुरू असून, या वादात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने उडी घेतली आहे. काश्मीर ना भारताचे ना पाकिस्तानचा, काश्मीर हे काश्मीरी जनतेचेच आहे, असे आफ्रिदीने त्याच्या 'गेम चेंजर' या आत्मचरित्रात लिहीले आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू आफ्रिदीने काश्मीर मुद्यावरून काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानला घरचा आहेर दिला होता. तो म्हणाला होता की,'' पाकिस्तानला काश्मीर नकोय. तो भारतालाही देऊ नका. काश्मीरी जनतेला स्वातंत्र्य हवे आहे. जेणेकरून माणुसकी जीवंत राहिल. तेथील लोकांना नरकयातना भोगण्यास भाग पाडू नका. पाकिस्तानला खरचं काश्मीर नकोय.. त्यांना चार प्रांत सांभाळता येत नाहीत.'' आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात याच मुद्याचा उल्लेख करताना म्हटले आहे की, 'काश्मीर हा काश्मीरी जनतेचा आहे. तो ना भारताचा आहे, ना पाकिस्तानचा. प्रथम आणि अखेरचे सत्य हेच आहे की काश्मीर हे काश्मीरी जनतेचे आहे. इम्रान खान यांनी काश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी आणखी प्रयत्न करायला हवेत. पंतप्रधानाबद्दल वक्तव्य करने सोपे आहे. मात्र, त्यांच्यासारखे काम करने कठीण आहे.'

आफ्रिदीचे आत्मचरित्र 'गेम चेंजर' नुकतेच प्रकाशित झाले आहे. आत्मचरित्रामध्ये क्रिकेटच्या रंजक कथा, विंग कमांडर अभिनंदन, काश्मीर, भारत-पाक आणि इम्रान खान सरकारवर यांसह विविध विषयावर लिहिले आहे. 'गेम चेंजर'ला आफ्रिदीने पत्रकार वजाहत एस खान यांच्या मदतीने लिहले असून, 'हार्परकॉलिन्स इंडिया इम्प्रिंट हॉर्पर स्पोर्ट्स'ने प्रकाशित केले आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणाऱ्या आफ्रिदीने पाकिस्तानकडून 398 वन डे सामन्यांत 8064 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 6 शतक व 39 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने 395 गडी बाद केले आहेत. 27 कसोटी सामन्यांत त्याने 1716 धावा केल्या असून, 48 गडी बाद केले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kashmir belongs to kashmiris not india or pakistan says shahid afridi in his autobiography game changer