एकानेही मास्क न घातलेल्या हजारोंच्या सभेत किम यांची कोरोनासंबंधी मोठी घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 10 October 2020

जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. जगात क्वचितच असा देश असेल, जेथे कोरोनाचे रुग्ण सापडले नसतील

पेंगॉंग- जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. जगात क्वचितच असा देश असेल, जेथे कोरोनाचे रुग्ण सापडले नसतील. यातच उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी मोठी घोषणा केली आहे. आतापर्यंत देशामध्ये कोरोनाचा एकही कोरोना रुग्ण सापडला नसल्याचे किम म्हणाले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी एका सभेत बोलताना हे जाहीर केले आहे. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते, पण एकानेही मास्क घातला नव्हता किंवा शारीरिक अंतराचे पालन करत असल्याचे दिसले नाही.

कामगार पक्षाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त एक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. किम यांनी  यावेळी कोरियायी नागरिकांचे कौतुक केले. नागरिकांनी टायफून नैसर्गिक आपत्तीच्याकाळी मोठ्या जिद्दीने लढाई दिली, असं ते म्हणाले. त्यांनी कोरोनाच्या स्थितीवरही भाष्य केलं. जगात कोरोना वाढत असताना उत्तर कोरियात एकही रुग्ण सापडला नसल्याचे ते म्हणाले. शिवाय दक्षिण कोरिया कोरोना महामारीच्या परिस्थितीतून लवकरच बाहेर यावा, अशी कामना त्यांनी केली.

भारत होतोय शस्त्रसज्ज! चिनी ड्रोनचा सामना करणार रुस्तम-२ आणि इस्त्राईली हेरॉन 

कार्यक्रमासाठी सर्व नेते मास्कशिवाय आले होते. किम यांनीही मास्क वापरला नव्हता. शिवाय पुष्पगुच्छ देणाऱ्या लहान मुलांच्या गालाचा चुंबनही किम यांनी घेतला. मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते, पण कोणीही शारीरिक अंतराचे पालन करत नव्हते. शिवाय लोकांपैकीही कोणी मास्क घातला नव्हता. 

उत्तर कोरियाची लोकसंख्या २.५५  कोटी आहे. उत्तर कोरियाची चीनसोबत सीमा लागून आहे. मात्र, उत्तर कोरिया कोरोना प्रादुर्भाव रोखण्यास यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे. काही तज्ज्ञांचे असंही मत आहे की, कोरियाने कोरोनासंबंधीची माहिती लपवून ठेवली आहे. देशात कोरोना चाचण्याही कमी घेण्यात आल्या. शिवाय छोट्या छोट्या क्लस्टर भागांना आयसोलेट करण्यात आले होते. कोरियाने जानेवारी महिन्यातच आपल्या देशाच्या सीमा बंद केल्या होत्या. शिवाय कोरोनाला रोखण्यासाठी काही उपाय करण्यात आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kim Jong Un said North Korea has no Covid victims