
अबब! एवढ्या ऍप्सनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी घातलीय...
वॉशिंग्टन : गेल्या 6 जानेवारी रोजी अमेरिकेच्या संसद भवन परिसरातील कॅपिटल हिल्समध्ये हिंसेला जबाबदार ठरवून कालच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या हिंसेनंतर लगेचच डोनाल्ड ट्रम्प यांना संभाव्य हिंसेची शक्यता लक्षात घेत ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरुन हाकलून लावण्यात आले. त्यानंतर काही काळानंतर युट्यूबनेही त्यांना एका आठवड्यासाठी बंदी घातली आहे. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता डोनाल्ड ट्रम्प यांना स्नॅपचॅटवरुन देखील कायमस्वरुपी हाकलण्यात आले आहे. स्नॅपचॅटने ही कारवाई करताना म्हटलंय की, डोनाल्ड ट्रम्प यांना होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
स्नॅपचॅटला अशी भीती वाटत होती की डोनाल्ड ट्रम्प आपल्या अकाऊंटचा वापर करुन अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधी दरम्यान अधिक अशांती माजवतील. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांच्या अकाऊंटला कायमस्वरुपी बंद करण्यात आलं आहे. मागच्या आठवड्यात स्नॅपचॅटने ट्रम्प यांच्या अकाऊंटवर अनिश्चित काळासाठी निलंबित केलं होतं.
हेही वाचा - ट्रम्प यांच्यावरील बंदीनंतर ट्विटरच्या CEOने सोडलं मौन, म्हणाले, 'कारवाईवर अभिमान नाही'
स्नॅपचॅटने म्हटलंय की, सार्वजनिक सुरक्षेच्या हितासाठी चुकीची माहिती पसरवणे, चुकीची भाषा वापरणे आणि हिंसेला चिथावणी देणे यांसारख्या गोष्टींसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं कृत्य जबाबदार ठरलं आहे. हे आमच्या ध्येयधोरणांचं उल्लंघन आहे. आम्ही त्यांचं अकाऊंट कायमस्वरुपी बंद करायचा निर्णय घेतला आहे.
या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी घातलीय बंदी
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर बंदी घातल्यानंतर प्रथमच ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॅक डोर्सी यांनी मौनं सोडलं आहे. आम्हाला डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर केलेल्या कारवाईवर कोणताही अभिमान नाही. कारण योग्य कंटेटला चालना देण्यासाठी मायर्कोब्लॉगिंग साईटची ही विफलता आहे. पण, ट्विटरने योग्य निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले आहेत.