ट्रम्प यांच्यावरील बंदीनंतर ट्विटरच्या CEOने सोडलं मौन, म्हणाले, 'कारवाईवर अभिमान नाही'

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 14 January 2021

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर बंदी घातल्यानंतर प्रथमच ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॅक डोर्सी यांनी मौनं सोडलं आहे

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर बंदी घातल्यानंतर प्रथमच ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॅक डोर्सी यांनी मौनं सोडलं आहे. आम्हाला डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर केलेल्या कारवाईवर कोणताही अभिमान  नाही. कारण योग्य कंटेटला चालना देण्यासाठी मायर्कोब्लॉगिंग साईटची ही विफलता आहे. पण, ट्विटरने योग्य निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले आहेत. 

निर्णयाच्या पक्षामध्ये जॅक यांनी म्हटलंय की स्पष्ट इशारा दिल्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. असे असले तरी टेक कंपनीच्या कारवाईमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जॅक डोर्सी यांनी यावर प्रतिक्रिया दिली. 

मानलं रावं! एक-दोनदा नव्हे तर तब्बल 157 वेळा दिली ड्रायव्हींग टेस्ट, तेव्हा...

ट्विटरने ट्रम्प यांच्यावर लावलेल्या प्रतिबंधावर आम्हाला कोणताही अभिमान  नाही. स्पष्ट इशारा दिल्यानंतर, आम्ही ही कारवाई केली आहे. ट्रम्प यांच्या ट्विटमुळे हिंसा भडकण्याचा धोका होता. याबाबतचा पूर्ण अभ्यास आणि माहिती गोळा करुनच त्यांच्या अकाऊंटवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला, असं जॅक डोर्सी म्हणाले आहेत. 

यूएस कॅपिटॉलमध्ये झालेल्या हिंसेनंतर ट्विटर, फेसबुक सारख्या सोशल मीडिया कंपन्यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई केली. त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट काही तासांसाठी बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर फेसबुकने अनिश्चितकाळासाठी ट्रम्प यांचे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शनिवारी ट्विटरने त्यांचे अकाऊंट कायम स्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला. 

धनजंय मुंडेंचा 'तो' वैयक्तिक प्रश्न, महाविकास आघाडी सरकारला धोका नाही...

ट्विटर सेफ्टीने यासंदर्भाट ट्विट करत म्हटलं होतं की, भविष्यात हिंसा भडकण्याची जोखीम आहे, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट '@realDonaldTrump' कायम स्वरुपी बंद केले जात आहे. ट्विटरने यूएस कॅपिटॉलवर झालेल्या हिंसेच्या दिवशीच ट्रम्प यांचं अकाऊंट 12 तासासाठी बंद केलं होतं आणि त्यांना इशारा देण्यात आला होती की, जर हिंसेला प्रोत्साहन देणारे ट्विट करत राहिलात तर अकाऊंट कायम स्वरुपी बंद करण्यात येईल. 

दरम्यान, ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या जवळपास 70 हजार समर्थकांचे ट्विटर अकाऊंट बंद केले आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती ज्यो बायडेन यांचा 20 जानेवारीला शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर यूट्यूबनेही त्यांचे पेज 20 जानेवारीपर्यंच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडिया कंपन्यांनी ट्रम्प यांच्याविरोधात कठोर पवित्रा घेतल्याचं दिसतंय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twitter ceo breaks silence on donald trump account suspension