साहित्याचा पुरस्कार यंदा स्थगित; परीक्षकेच्या पतीवर लैंगिक शोषणाचे आरोप 

यूएनआय
शनिवार, 5 मे 2018

गेल्या नोव्हेंबरपासून या विषयावर चर्चा सुरू आहे. याबाबात वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून हा विषय कसा हाताळावा यावर अकादमीच्या 18 सदस्यांमध्ये एकमत होत नव्हते. अखेर त्यातील सहा सस्यांनी नुकताच सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

स्टॉकहोम : प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार यंदा साहित्य क्षेत्रासाठी कोणालाही देण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 70 वर्षांत प्रथमच साहित्याला नोबेल पुरस्काराने गौरविण्यात येणार नाही. स्वीडनमधील सांस्कृतिक क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व व स्वीडिश अकादमीमधील महिला परीक्षक व कवयित्री कतरिना फ्रोस्टेनसन यांचे पती जीन क्‍लॉऊड अरनॉल्ट यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्याने अकादमीने हा निर्णय शुक्रवारी घेतला. 

अरनॉल्ट यांच्यावरील आरोपांमुळे यंदा साहित्यातील विजेत्याची निवड करण्यात येणार नाही, असा निर्णय स्टॉकहोम येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. साहित्याचे दोन पुरस्कार पुढील वर्षी म्हणजे 2019मध्ये दिले जाणार आहेत, असे अकादमीच्या हंगामी स्थायी चिटणीस अँड्रेस ओल्सन यांनी आज सांगितले. महिला अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या # ME Too या मोहिमेतून अरनॉल्ट यांचे नाव उघड झाले आहे. स्वीडनमधील वृत्तपत्र "डग्नेस निथर'ने दिलेल्या वृत्तामध्ये अरनॉल्ट यांचे नाव प्रसिद्ध झाले आहे. अरनॉल्ट यांनी आपल्यावर बलात्कार, लैंगिक शोषण केल्याचा दावा 18 महिलांनी केल्याचे या वृत्तात म्हटले आहे. 

गेल्या नोव्हेंबरपासून या विषयावर चर्चा सुरू आहे. याबाबात वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून हा विषय कसा हाताळावा यावर अकादमीच्या 18 सदस्यांमध्ये एकमत होत नव्हते. अखेर त्यातील सहा सस्यांनी नुकताच सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यात समितीचे स्थायी चिटणीस सारा डॅनिअस यांचा समावेश आहे. 

अकादमीच्या नावाला काळिमा 
सचोटी, प्रामाणिकपणा व बुद्धिवादी संस्था असा नावलौकिक स्वीडिश अकदमीचा आहे. सोशल मीडियावर सुरू झालेल्या # ME Too या मोहिमेंतर्गत नोव्हेंबर 2017मध्ये अरनॉल्ट यांच्यावर 18 महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला. यामुळे संस्थेचे नाव मलिन झाले असून, जनतेमधील विश्‍वासाला तडा गेला आहे. छायाचित्रकार असलेला अरनॉल्ट फ्रॉस्टेनसन यांचा पती असल्याने त्यांना निवड समितीमधून काढण्यासाठी मतदान घेण्यात आले. या दोघांशी सर्व प्रकारचे संबंध अकादमीने तोडले असल्याचे डॅनिअस यांनी सांगितले. 

सहा वेळा पुरस्कार रद्द 
स्वीडिश अकादमीची सुरवात 1786मध्ये झाली आहे. तेव्हापासून सहा वेळा साहित्याचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला नाही. 1915, 1919, 1925, 1926, 1927 व 1936 मध्ये विविध कारणांमुळे हा पुरस्कार दिला गेला नाही. चार वेळा पुरस्कार वितरणाची तारीख पुढे ढकलण्यात आली व पुढील वर्षी ते देण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Literature award postponed Trial of sexual harassment