पत्नीला खांद्यावर घेऊन पळत सुटला अन् मिळाली बिअर

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जुलै 2019

जगभरात विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. विजेत्या स्पर्धकाला काहीतरी बक्षीस ठरलेले असते. मात्र, एक स्पर्धा आगळी-वेगळी होती.

सोनकाजर्वी (फिनलंड) : जगभरात विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. विजेत्या स्पर्धकाला काहीतरी बक्षीस ठरलेले असते. मात्र, एक स्पर्धा आगळी-वेगळी होती. पत्नीला खांद्यावर उचलून ठराविक अंतर पार करण्याच्या शर्यती होती. यामध्ये एकाने पत्नीला खांद्यावर उचलून घेतले अन् पळत सुटला. विशेष म्हणजे तो जिंकलाही अन् त्याला मिळाली पत्नीच्या वजनाएवढी बिअर.

जागतिक 'वाईफ कॅरिंग चॅम्पियनशीप' अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. फिनलंडमध्ये यंदा भरवल्या गेलेल्या या स्पर्धेत लिथुएनिया या दक्षिण युरोपीय देशातील जोडप्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. विजेत्या जोडप्याला पत्नीच्या वजनाइतकी बिअर बक्षिस म्हणून मिळाली. विशेष म्हणजे या जोडप्याने सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. वाईफ कॅरिंग चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीमध्ये 24 स्पर्धक जोडप्यांची निवड झाली होती. वैतौटस किर्कीऔस्कस आणि त्याची पत्नी नेरिंगा किर्कीओस्कीन यांच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडली. त्यांनी एक मिनिट सहा सेकंदाच्या कालावधीत 253.5 मीटर अंतराची अडथळ्याची शर्यत पार केली.

सहा वेळा विजेते राहिलेल्या फिनलंडच्या जोडप्याला त्यांनी अवघ्या 0.1 सेकंदाच्या फरकाने पराभूत केले आहे. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांना काही अंतर पाण्यातूनही पार करायचं होते. स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पोलंड आणि ब्रिटनमध्ये पार पडल्या होत्या. चार हजार लोकसंख्या असलेल्या फिनलंडमधील सोनकाजर्वी शहरात शनिवारी (ता. 13) भरलेली अंतिम पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lithuanian couple won world wife carrying championship