केंब्रिज ऍनालिटिक कार्यालयाची झडती

वृत्तसंस्था
शनिवार, 24 मार्च 2018

आमच्या कर्मचारी आणि कामांची ज्यांना ओळख आहे, तेच साक्ष देऊ शकतील. आम्ही राजकीय प्रभावाखाली वावरणाऱ्या किंवा बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या एखाद्या कंपनीप्रमाणे आमचे स्वरूप नाही.
- अलेक्‍झांडर टेयलर, सीइओ, केंब्रिज ऍनालिटिका

फेसबुक डेटा लिकप्रकरणी ब्रिटिश नियामकची कारवाई

लंडन  : फेसबुक डेटा लिकप्रकरणी आज लंडन येथील केंब्रिज ऍनालिटिका कंपनीच्या कार्यालयाची ब्रिटिश नियामक मंडळाने झाडाझडती घेतली. तत्पूर्वी ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने तपासणीचे वॉरंट काढण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर ब्रिटनच्या माहिती आयुक्त कार्यालयातील अंमलबजावणी संचालनालयाच्या 18 अधिकाऱ्यांनी स्थानिक वेळेनुसार काल रात्री 8 च्या सुमारास केंब्रिज ऍनालिटिकाच्या कार्यालयाची झडती घेतल्याचे एएफपीने वृत्त दिले आहे.

डेटा वॉचडॉगच्या प्रवक्‍त्याने ही झडती स्थानिक वेळेनुसार पहाटे 3 पर्यंत सुरू होती, असे सांगितले. कंपनीवर पुढील कार्यवाही करण्यासाठी आवश्‍यक पुरावे गोळा करण्यासाठी ही झडती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. व्यवसायिक कलाकार, सोशल मीडिया कंपन्या, पक्ष कार्यालयाची ज्या कायद्यानुसार चौकशी केली जाते, त्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराच्या प्रारंभीच्या काळात केंब्रिज ऍनालिटिक कंपनीने मदत केल्याच्या आरोपात तथ्य आहे की नाही याची चाचपणी डेटा वॉचडॉग करत आहेत. यादरम्यान ब्रिटनचे चॅनल फोर न्यूजच्या स्टिंग ऑपरेशननंतर केंब्रिज ऍनालिटिकाचे सीईओ ऍलेक्‍झांडर निक्‍स यांना निलंबित करण्यात आले असून, अटकही केली आहे. त्याच वेळी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने चूक झाल्याची कबुली देत यूजरचा डेटा सुरक्षित राखण्याची आमची जबाबदारी असल्याचे नमूद केले होते. दरम्यान, केंब्रिज ऍनालिटिकाने सर्व आरोप फेटाळून लावले असून, सत्याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्रपणे थर्ड पार्टी ऑडिट केले जात असल्याची माहिती दिली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: london news facebook deta leack and cambridge analytica