खरेदी करून 20 मिनिटं होण्याआधी कोट्यवधींच्या कारची अशी झाली अवस्था

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

फक्त 20 मिनिटांपूर्वी गाडीची खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर गाडीची जी काही अवस्था झाली त्याची कोणी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. 

नवी दिल्ली - सोशल मीडियावर एका लम्बोर्गिनी कारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. महागडी असलेल्या या गाडीचा अपघातात चक्काचूर झाल्याचं यामध्ये दिसतं. खरंतर सर्वसामान्य अपघातासारखाच हा अपघात आहे. यामध्ये असलेली कार महागडी आहे यापलिकडे आणखी एका कारणामुळे व्हिडिओ, फोटो व्हायरल होत आहेत. ते कारण म्हणजे अपघात होण्याआधी फक्त 20 मिनिटांपूर्वी गाडीची खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर गाडीची जी काही अवस्था झाली त्याची कोणी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. 

पोलिसांनी ट्विटरवर या कारचे फोटो शेअर केले आहेत. त्यात त्यांनी म्हटलं की, ब्रँड न्यू लम्बोर्गिनी 20 मिनिटांपूर्वीच शोरूममधून काढण्यात आली होती. त्यानंतर तांत्रिक अडचण आल्यानं गाडी रस्त्यातच थांबली. स्टेअरिंग आणि चाके लॉक झालेल्या या कारला मागून येणाऱ्या एका गाडीने जोरदार धडक दिली. या गाडीची किंमत अंदाजे 1 कोटी 80 लाखांहून जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. 

कोरोना लसीची घाई हानिकारक; वैद्यकीय तज्ज्ञांना चिंता

फोटो शेअर करताना पोलिसांनी म्हटलं आहे की, M1 वेस्ट यॉर्कशायरमध्ये लम्बोर्गिनी अचानक बिघडल्यानं रस्त्यातच लॉक झाली. तेव्हा एका गाडीची लम्बोर्गिनीला जोराची धडक बसली. लम्बोर्गिनीचे फोटो सोशल मीडियावर यानंतर तुफान व्हायरल झाले आहेत. 

याबाबत वेस्ट यॉर्कशायर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लंडनमधील M1 वेस्ट यॉर्कशायरमध्ये झालेल्या अपघातात लम्बोर्गिनीचा आणि धडक दिलेल्या वाहनातील चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. लम्बोर्गिनीच्या अपघाताची ही घटना गुरुवारी दुपारी 1 वाजता घडली. अपघातग्रस्त दोन्ही गाड्या रस्त्यातून बाजुला करण्यात आल्या आहेत.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lumborgini accident after 20 minutes purchased