राजपक्ष यांनी घेतली श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

महिंदा राजपक्ष यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. भारत-श्रीलंका संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. 

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

कोलंबो : श्रीलंकेचे नवनिर्वाचित पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांनी गुरुवारी आपल्या पदाची शपथ घेतली. श्रीलंकेचे 23 वे पंतप्रधान असलेल्या महिंदा यांना त्यांचे लहान भाऊ व नवनिर्वाचित अध्यक्ष गोटाबया राजपक्ष यांनी राष्ट्रपती सचिवालयात शपथ दिली. ऑगस्ट 2020 मध्ये होणाऱ्या निवडणुकीपर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करतील. 

महिंदा राजपक्ष यांनी यापूर्वी 2005 ते 2015 या कालावधीत देशाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच 2018 मध्ये काही काळापुरते त्यांनी पंतप्रधानपदाचे कामही पाहिलेले आहे. 16 नोव्हेंबरला झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत गोटाबया यांनी युनायटेड नॅशनल पार्टीचे (यूएनपी) उपनेते साजित प्रेमदास यांचा पराभव केला. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान विक्रमसिंघे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष गोटाबया यांनी बुधवारी महिंदा यांच्या नावाची नवीन पंतप्रधान म्हणून घोषणा केली होती. त्यानंतर आज त्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली.

1970 मध्ये खासदार झालेले महिंदा राजपक्ष हे श्रीलंकेतील सर्वांत तरुण खासदार होते. महिंदा आणि गोटाबया यांनी निर्णायक मोहिमा आखत देशात दहशत निर्माण करणाऱ्या लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ इलमचा (एलटीटीई) बीमोड करत श्रीलंकेत तीन दशकांपासून सुरू असलेले गृहयुद्ध संपुष्टात आणले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahinda Rajapaksa Takes Oath As Sri Lanka Prime Minister