कोरोनाच्या संकटात भर; अमेरिकेतील रुग्णालयांवर मोठा सायबर हल्ला

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 29 September 2020

अमेरिकेतील एका मोठ्या हॉस्पिटलच्या सर्व शाखांची कॉम्प्युटर सिस्टिम हॅक करण्यात आली आहे.

वॉशिंग्टन- काही दिवसांपूर्वी अमेरिकेत अनेक मोठ्या व्यक्तींचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर अमेरिकेत आणखी एक मोठा सायबर हल्ला झाला आहे. अमेरिकेतील एका मोठ्या हॉस्पिटलच्या सर्व शाखांची कॉम्प्युटर सिस्टिम हॅक करण्यात आली आहे. साईट हॅक झाल्याने सर्व डॉक्टर आणि नर्संना कामासाठी ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतीचा वापर कराला लागला. कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी आरोग्य संस्था दिवसरात्र काम करत आहेत, अशात सायबर हल्ला झाला असल्याने हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना अडचणीँचा सामना कराला लागत आहे. 

मेंदू खाणाऱ्या अमिबाने 6 वर्षाच्या मुलाचा घेतला जीव; अमेरिकेत हाय अलर्ट

यूनिवर्सल हेल्थ सर्विसेज अंतर्गत अमेरिकेत 250 हॉस्पिटल आणि आरोग्य केंद्र येतात. सोमवारी या संस्थेच्या वेबसाईटवर सायबर हल्ला करण्यात आला. संस्थेने आपले वक्तव्य जारी करत याबाबतची माहिती दिली. साईट हॅक झाल्याने सर्व कामांसाठी कागद आणि इतर साहित्यांचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. हॅकर्सनी याबदल्यात कशाची मागणी केली हे अजून कळू शकलेले नाही. 

''फॉर्चुन 500'' कंपनीने माहिती दिली आहे की, सर्व रुग्णांवरील उपचार सुरळीत सुरु आहेत. रुग्णांची माहिती जाणून घेण्यासाठी हा सायबर हल्ला करण्यात आल्याचा कोणताही पुरावा नाही. कंपनीमध्ये जवळजवळ 90 हजार कर्मचारी काम करतात. 

पश्चिम बंगालमध्ये वाढले मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण; पुण्यातल्या अधिकाऱ्याची...

''अमेरिकन हॉस्पिटल असोसिएशन''चे वरिष्ठ सायबर सुरक्षा सल्लागार जॉन रिग्गी यांनी या हल्ल्याला 'संदिग्ध रॅनसमवेअर हल्ला' म्हटलं आहे. कोरोना महामारीचा प्रकोप वाढत असताना सायबर गुन्हेगार आरोग्य संस्थांच्या नेटवर्कला निशाणा बनवत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.  रॅनसमवेअर एक प्रकारचे सॉफ्टवेअर आहे, ज्याच्या माध्यमातून डाटा चोरी करणे शक्य होते. डाटा चोरी केल्यानंतर त्याबदल्यात पैसे मागण्यात येतात. सायबर सुरक्षा कंपनी एमसिसॉफ्टने केलेल्या माहिती संकलनानुसार मागील वर्षी अमेरिकेतील 764 आरोग्य संस्था रॅनसमवेअरच्या शिकार झाल्या होत्या. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: major cyber attack on american hospital coronavirus make it worst