मोदींवरून पाकमध्ये गदारोळ 

वृत्तसंस्था
Tuesday, 20 October 2020

आपली देशभक्ती सिद्ध करण्यासाठी या दोघांनी मोदी यांच्या संदर्भाचे हत्यार उपसले. पाकिस्तान डेमोक्रॅटीक मुव्हमेंट नावाने विरोधकांनी आघाडी उघडून मोर्चा आणि सभांचे आयोजन सुरू केले आहे.

इस्लामाबाद - पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात सर्व प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आले असल्यामुळे पाकिस्तानमधील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यात सोमवारी आणखी भर पडली ती शेजारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरून. मोदी हे तुमचेच मित्र असल्याचा आरोप इम्रान आणि पाकिस्तान मुस्लीम लीगच्या (नवाझ गट) मरीयम नवाझ यांनी एकमेकांवर केला आहे. 

आपली देशभक्ती सिद्ध करण्यासाठी या दोघांनी मोदी यांच्या संदर्भाचे हत्यार उपसले. पाकिस्तान डेमोक्रॅटीक मुव्हमेंट नावाने विरोधकांनी आघाडी उघडून मोर्चा आणि सभांचे आयोजन सुरू केले आहे. विरोधकांनी लष्करावरही टीका केली आहे. त्यामुळे इम्रान तसेच लष्करासमोर मोठेच आव्हान निर्माण झाले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नवाझ शरीफ यांचा उल्लेख मोदी यांचे मित्र म्हणून केला जायचा असे वक्तव्य इम्रान यांनी केले होते. त्यावर नवाझ यांची मुलगी तसेच पक्षाच्या उपाध्यक्ष असलेल्या मरीयम यांनी कराचीतील जीना मैदानावरील सभेत जोरदार प्रत्युत्तर दिले. 

इम्रान यांना उद्देशून त्या म्हणाल्या की, विरोधक मोदींची भाषा बोलतात असे तुम्ही म्हणतात. प्रत्यक्षात त्यांच्या फेरनिवडीसाठी तुम्हीच प्रार्थना करीत होता. त्यांच्याशी संवाद साधण्यास तुमचा जीव तीळतीळ तुटत होता. तुम्हीच त्यांना काश्मीर आयते दिले....आणि असे असताना मोदींची भाषा मात्र आम्ही बोलतो ? आम्ही जाब विचारतो तेव्हा तुम्ही (इम्रान) लष्कराच्या मागे लपून बसता. तुम्ही भित्रे आहोत. तुम्ही लष्कराची बदनामी केली. अपयश लपविण्यासाठी तुम्ही लष्कराचा वापर करता. हा अधिकार तुम्हाला कुणी दिला. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मरीयम पुढे म्हणाल्या की, एकाच सभेनंतर इम्रान म्हणतात, घाबरायचे नाही. याचा अर्थ ते आत्ताच चिंताक्रांत झाले आहेत. 

पीपीपीचा पुढाकार 
कराचीतील जीना मैदानावर झालेल्या सभेला हजारो नागरिक उपस्थित होते. सिंध प्रांतात पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) या विरोधी पक्षाचे सरकार आहे. सभेच्या आयोजनात पीपीपीने पुढाकार घेतला होता. ही सभा यशस्वी झाल्याचे मत राजकीय निरीक्षकांनी नोंदविले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लष्कराबाबत सौम्य विधान 
विरोधकांनी एकत्र आल्यानंतर लष्करालाही धारेवर धरले होते. त्या पार्श्वभूमीवर मरीयम यांनी सभेत मात्र सौम्य विधान केले. पाकिस्तान डेमोक्रॅटीक मुव्हमेंटचा विरोध संपूर्ण लष्कराला नव्हे तर केवळ काही अधिकाऱ्यांना आहे, असे त्या म्हणाल्या. बलिदान दिलेल्या सैनिकांना नवाझ यांचा सलाम आहे. मरीयमचाही सलाम आणि आम्हा सर्वांचा सलाम, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major opposition parties have come together against Prime Minister Imran Khan