कोरोनापेक्षा धोकादायक विषाणू; मलेशियात भारतीय नागरिकामुळे संक्रमण

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 17 August 2020

कोरोना व्हायरसचा नवा प्रकार (strain) आढळला आहे. सध्याच्या व्हायरसपेक्षा याचा प्रादुर्भाव 10 पटीने अधिक वेगाने पसरु शकतो.

जगभरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. या कोरोनाच्या वाढत्या फैलावाला रोखण्यासाठी विविध देशात सध्या लस शोधण्यासाठी संशोधन सुरु आहे. इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठ असेल अथवा अमेरिकेतील मॉडर्ना औषधनिर्माण कंपनी या सगळ्यांच्या लशी चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत. इकडे भारतातही पंतप्रधान मोदींनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरील झालेल्या भाषणात भारतातील लशींची माहिती दिली होती. भारतात सध्या 3 लशींवर काम चालू असून त्या सध्या मानवी चाचणीच्या टप्प्यात आहेत.  ही लशीबाबत सकारात्मक बातमी येत असतानाच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ही बातमी आहे ती मलेशियातून. 

मॉरिशसमध्ये तेल गळतीने पर्यावरणाची अपरिमित हानी; इतके महत्त्व का?

याठिकाणी कोरोना व्हायरसचा नवा प्रकार (strain) आढळला आहे. सध्याच्या व्हायरसपेक्षा याचा प्रादुर्भाव 10 पटीने अधिक वेगाने पसरु शकतो. यामुळे आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या लशींवर झालेलं  संशोधन वायाही जाऊ शकते.  या नवीन  'उत्परिवर्तन' (mutation) झालेल्या कोरोनाच्या व्हायरसला  'D 614' या नावाने ओळखले जाते. महत्वाचे म्हणजे मलेशियात या व्हायरसने बाधित झालेला रुग्ण भारतातूनच गेला होता. तो मलेशियातील एक हॉटेलचालक आहे. मलेशियात आल्यानंतर त्या व्यक्तीला 14 दिवस कॉरंटाईन केलं होतं. पण त्याने कॉरंटाईनचे नियम तोडल्यामुळे त्याला अटक केलं होतं.

संक्रमणाचा वेगवान प्रसार होण्याची शक्यता:

कॉरंटाईनचे नियम मोडल्याबद्दल आरोपी व्यक्तीला 5 महिन्यांची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे.  फिलिपिन्समधून परतणाऱ्या एका गटामध्येही D 614 ची लक्षणे आढळली आहेत.  जिथं कोरोनाचा हा प्रकार 45 पैकी 3 लोकांमध्ये आढळला आहे. कोरोना व्हायरसमध्ये झालेल्या या उत्परिवर्तनामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार लवकर होऊ शकतो, असं अमेरिकेचे सर्वोच्च आरोग्य सल्लागार डॉ. फौसी यांनी सांगितलं आहे. 

वॉल स्ट्रिट जर्नलच्या रिपोर्टवरुन भाजप-काँग्रेस समोरासमोर

जागतिक आरोग्य संघटनेने  'D 614' बद्दल काय सांगतले आहे?

कोरोना व्हायरसचे हे उत्परिवर्तन अमेरिका आणि युरोपमधील देशांमध्येही वेगाने पसरत आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, या व्हायरस उत्परिवर्तनामुळे लोकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागला आहे. तसेच आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या लशींवर झालेलं  संशोधन वाया जाऊ शकतं असं 'सेल प्रेस'मध्ये प्रकाशित केलेल्या एका संशोधन पत्रकात असे म्हटले आहे. 

"सध्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आणि अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.  कोरोनाचा हा नवीन प्रकार आता मलेशियात पसरत आहे. सरकारला लोकांच्या समर्थनाची नितांत आवश्यकता आहे जेणेकरून आम्ही कोणत्याही उत्परिवर्तनातून संक्रमणाची लिंक तोडू शकतो." असं मलेशियन आरोग्य विभागाच्या महासंचालकांनी  मलेशियन नागरिकांना आवाहन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malaysian scientists discover ten times deadlier coronavirus strain