उत्तर कोरियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी

पीटीआय
बुधवार, 5 जुलै 2017

सोल : उत्तर कोरियाने आज त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वांत लांब पल्ल्याच्या आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. हे क्षेपणास्त्र अमेरिकेतील अलास्का राज्यापर्यंत पोचू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या चाचणीमुळे अमेरिकेने संताप व्यक्त केला आहे. 

उत्तर कोरियाच्या उत्तर प्योंगान प्रांतातून ही चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र 930 किमी लांब जात समुद्रात कोसळले, असे सूत्रांनी सांगितले. या क्षेपणास्त्राने 2800 किमी उंची गाठली होती, असाही दावा जपानने केला आहे.

सोल : उत्तर कोरियाने आज त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वांत लांब पल्ल्याच्या आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. हे क्षेपणास्त्र अमेरिकेतील अलास्का राज्यापर्यंत पोचू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या चाचणीमुळे अमेरिकेने संताप व्यक्त केला आहे. 

उत्तर कोरियाच्या उत्तर प्योंगान प्रांतातून ही चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र 930 किमी लांब जात समुद्रात कोसळले, असे सूत्रांनी सांगितले. या क्षेपणास्त्राने 2800 किमी उंची गाठली होती, असाही दावा जपानने केला आहे.

6700 किमी उंची गाठण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र अलास्कापर्यंत पोचू शकते, असा अंदाज अमेरिकेतील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या स्वांतत्र्यदिनीच त्यांच्यावर हल्ला करण्याची उघड धमकी देणाऱ्या उत्तर कोरियाने ही चाचणी केल्याने या युद्धखोर देशापासून असलेल्या धोक्‍याबाबत नव्याने अंदाज बांधावा लागणार असल्याचे अमेरिकेतील विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

अमेरिकेच्या मुख्य भूमीवर हल्ला करण्याची क्षमता असलेले क्षेपणास्त्र निर्माण करण्याची उत्तर कोरियाची पूर्वीपासूनच इच्छा आहे. मात्र, असे होऊ देणार नाही, असा दावा अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. उत्तर कोरियाची सत्ता किम जोंग उन यांच्या हातात आल्यापासून या देशाने क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात वेगाने प्रगती केली असून त्यांनी गेल्या काही काळातच तीन वेळेस अण्वस्त्र चाचणी आणि अनेकदा क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या आहेत. 

ही चाचणी यशस्वी झाल्याचे उत्तर कोरियाने जाहीर केले आहे. आमचा देश अत्यंत शक्तिशाली आणि अण्वस्त्रधारी असून जगात कोठेही हल्ला करण्याची आमची क्षमता असल्याचेही उत्तर कोरियाच्या सरकारी वाहिनीने म्हटले आहे. उत्तर कोरियाच्या सततच्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्यावर अनेक निर्बंध घातले आहेत. तरीही दबावाला न झुगारता किम जोंग उन यांनी आज पुन्हा चाचणी घेतली आहे. यामुळे त्यांचा पारंपरिक शत्रू असलेल्या दक्षिण कोरियाबरोबरील तणावात भर पडणार आहे. 

उत्तर कोरियाला संपवा : ट्रम्प 
उत्तर कोरियाच्या या चाचणीनंतर अमेरिकेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'या लोकांना आयुष्यात दुसरे काही चांगले करता येत नाही का?', असे ट्‌विट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला राग व्यक्त केला आहे. तसेच, 'हा मूर्खपणा कायमचा संपवून टाका,' अशी विनंती चीनला करत उत्तर कोरियाला संपवून टाकण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यास सांगितले आहे. 

शांतता राखण्याची चीनची विनंती 
उत्तर कोरियाने घेतलेल्या चाचणीनंतर अमेरिकेने थयथयाट केल्यानंतर आणि या देशाला संपवून टाकण्याची भाषा केल्यानंतर उत्तर कोरियाचा एकमेव मित्रदेश असलेल्या चीनने सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. उत्तर कोरियाला चाचण्यांपासून परावृत्त करण्यासाठी चीनचे सातत्याने प्रयत्न सुरू असून संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांचा भंग केल्याच्या या कृत्याचा आम्ही निषेध करत आहोत, असे चीनने म्हटले आहे. मात्र, इतर देशांनी शांतता कायम ठेवून या भागातील तणाव कमी करण्यास मदत करावी आणि चर्चेच्या माध्यमातूनच प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे चीनने आवाहन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news global news North Korea Missile test US China Donald Trump