'जेरुसलेम' प्रकरणी अमेरिका जगात एकटी; भारताचेही विरोधात मतदान

Donald Trump
Donald Trump

न्यूयॉर्क : जेरुसलेमला इस्राईलची राजधानी जाहीर करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत भारतासह 128 देशांनी विरोध केला. यामुळे या मुद्यावर जगभरात अमेरिका एकटी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेत पश्‍चिम आशियातील राजकीय परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. या निर्णयाला विरोध करणाऱ्या देशांशी आर्थिक संबंध तोडून टाकण्याचा गर्भित इशाराही त्यांनी दिला होता. पण या इशाऱ्याचा इजिप्त, जॉर्डन आणि इराकसारख्या देशांवर काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी या निर्णयाच्या विरोधातच मतदान केले. 

या व्यासपीठावर विविध देशांच्या प्रतिनिधींनी मत व्यक्त केले; मात्र भारतातर्फे कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. 

अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, चेक प्रजासत्ताक, हंगेरी, मेक्‍सिको, फिलिपिन्स, पोलंड, रवांडा, दक्षिण सुदान आणि युगांडा या देशांनी या मुद्यावर तटस्थ राहणे पसंत केले. ग्वाटेमाला, होंडुरास, मार्शल आयलंड्‌स, मायक्रोनेशिया, टोगो या देशांनी अमेरिका आणि इस्राईलच्या बाजूने मतदान केले. 

जेरुसलेम हीच आमची राजधानी होती, आहे आणि यापुढेही राहील! 
- बेंजमिन नेतान्याहू, इस्राईलचे पंतप्रधान 

हे मतदान म्हणजे पॅलेस्टाईनचा विजय आहे. संयुक्त राष्ट्र आणि इतर सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरील इस्राईलचे अतिक्रमण हटविण्यासाठीचा आमचा लढा सुरूच राहील. 
- पॅलेस्टाईनचे पंतप्रधान महमुद अब्बास यांचे प्रवक्ते 

मिस्टर ट्रम्प, तुर्कस्तानची लोकशाही तुम्ही तुमच्या डॉलरनी विकत घेऊ शकत नाही. 
- तय्यिप एर्दोगन, तुर्कस्तानचे अध्यक्ष 

अमेरिका हा दिवस कधीच विसरणार नाही. संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर एकटे पाडण्यात आले. आता आमच्याकडे मदत मागितली जाताना हा दिवस आम्ही नक्कीच लक्षात ठेवू. 
- निकी हॅले, अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांतील राजदूत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com