जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद भारताकडे

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : 'राजधानी दिल्लीसह इतर प्रमुख शहरांमधील वायू प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जाताना भारताने केलेले प्रयत्न इतरांसाठी मार्गदर्शक आहेत', असे कौतुक संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्य्रक्रमामध्ये करण्यात आले. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद भारताकडे सोपविण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. 'प्लॅस्टिकच्या प्रदूषणाचा पराभव' ही यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची मुख्य 'थीम' असेल. 

'विकास आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये भारताने समतोल साधण्यात यश मिळविले आहे' असे निरीक्षण संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमात (यूएनईपी) नोंदविण्यात आले आहे. पर्यावरण मंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि 'यूएनईपी'चे प्रमुख एरिक सोलहेम यांनी काल (सोमवार) संयुक्तरित्या यजमानपदाची घोषणा केली. जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी आहे. 

प्लॅस्टिकच्या भस्मासुराशी लढण्याचे आव्हान पेलण्यासाठी 'यूएनईपी'ने जगभरातील देश, उद्योगविश्‍व आणि नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. प्लॅस्टिकने होणारे प्रदूषण रोखायचे असेल, तर अपारंपरिक उर्जास्रोतांचा वापर वाढविणे आणि प्लॅस्टिकचे उत्पादन तातडीने कमी करण्याबरोबरच, प्लॅस्टिकच्या पुनर्वापरावर भर देण्याचे गरज अधोरेखित करण्यात आली आहे. 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले. देशभरात प्लॅस्टिकविरोधी उपक्रम राबविले जाणार आहेत; तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान आणि जंगल, समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता यावरदेखील भर देण्यात येणार आहे. 

प्लॅस्टिकचा भस्मासूर.. 

  • दरवर्षी जगभरात 500 अब्ज प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होतो 
  • दरवर्षी किमान 80 लाख टन प्लॅस्टिक समुद्रात जाते 
  • गेल्या 100 वर्षांत जितकी प्लॅस्टिक निर्मिती झाली, त्यापेक्षा जास्त प्लॅस्टिक निर्मिती गेल्या 10 वर्षांत झाली. 
  • एकूण कचऱ्यापैकी प्लॅस्टिकचा वाटा 10 टक्के आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news World Environment Day Plastic Pollution UNEP