America Ashadhi Wari : 'पाऊले चालती…' मराठी माणसाची विठोबा वारी थेट सॅन फ्रान्सिस्को अमेरिकेमध्ये

दरवर्षी वारकऱ्यांनी सामुदायिक रीत्या आषाढी एकादशीच्या आधी आळंदी ते पंढरपूर केलेली पदयात्रा म्हणजे वारी.
Ashadhi Wari
Ashadhi WariSakal

दरवर्षी वारकऱ्यांनी सामुदायिक रीत्या आषाढी एकादशीच्या आधी आळंदी ते पंढरपूर केलेली पदयात्रा म्हणजे वारी. वारी महाराष्ट्राचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव आहे. वारकर्‍यांची माऊलीवर असलेली अतूट भक्ती, अमाप श्रद्धा आणि त्याच्या दर्शनासी केलेला दृढ निर्धार, चिकाटी, अथक परिश्रम, ऊन - पाऊस - वारा यांची तमा न बाळगता अविरत पायी वाटचाल करण्याची सिद्धता.

आषाढी वारीचे आपणा सर्वांनाच नेहमी कुतुहल असते. कसे हे वारकरी उन्हातान्हात एवढे मैलोनमैल चालत असतील? कुठे रहात असतील? काय खात असतील? आणि मग जशा वारीच्या बातम्या यायला लागतात तसे आपणही एकदातरी हा अनुभव नक्की घ्यावा ही सुप्त इच्छाही मनात जागी होते.

बे एरियातील काही मंडळी ह्या वर्षी पंढरपूरच्या वारीला निघणार होती. त्यानिमित्त झालेल्या एका कार्यक्रमातच प्रथमच बे एरिया मधे होणाऱ्या वारीची बीजं रुजली गेली. MMBA चे अध्यक्ष भास्कर रानडे आणि वीणाताई उत्तरवार ह्यांना हि धाडसी कल्पना सुचली. धाडसी अशासाठी की, वारीला प्रतिसाद मिळेल कि नाही, लोकं वीकएंड ना इतक्या सकाळी उठून येतील का? हे व असे अनेक किंतु मनात होते.

कोणी बरोबर आले तर ठीकच नाहीतर आपण तरी सुरुवात करू ह्या विचाराने पहिली पावले उचलली गेली. १० जून, ज्या दिवशी आळंदीहून वारीला प्रारंभ होतो त्या दिवशी बे एरिया वारीलाही सुरुवात करायची. आणि त्यानंतर आषाढी एकादशीपर्यंत प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी सात वाजता रिव्हरव्यू पार्क पासून वारीला सुरुवात करून, साधारण साडेतीन मैलांवर असलेल्या बालाजी मंदिरात सांगता करायची. असे एकंदर स्वरूप ठरले. त्याप्रमाणे आवश्यक त्या परवानग्या, लोकांना सहभागासाठी निमंत्रित करणे हि सगळी कामे ओघाने आलीच.

सकाळी साधारण पावणेसात पासूनच साड्या, पंजाबी ड्रेस, पांढरे-भगवे कुडते आदी पारंपरिक पोषाखातील बायामाणसे, मुलं-मुली यांचा मेळा भरायला सुरुवात झाली. उंचावलेले भगवे झेंडे, झांजांची किणकिण, स्वागताला लावलेला चंदनाचा उर्ध्वपुंड्र वैष्णव टिळा आणि आसमंतात पसरलेला उत्साह नवोदितांना आपल्यात सामावून घेत होता. ही सगळी मंडळी जमली होती वारीला, महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर, कॅलिफोर्नियातील बे एरियात.

मराठी माणूस महाराष्ट्राच्या बाहेर गेला तरी त्याच मराठीपण तो त्याच्याबरोबर घेऊनच जातो. हीच सगळी मराठी मनं मग वारीकडे नाही धावली तरच नवल. गेल्या सहा वाऱ्या मिळून साधारण सहा-सातशे लोकांनीं तरी ह्या वारीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. वयस्कर मंडळी, त्यांना सावकाश घेऊन जाणारी त्यांची मुलं-मुली, सुना-जावई, stroller मध्ये किंवा पाठुंगळी लेकरांना घेऊन पायी निघालेले लेकुरवाळे आईबाप, जोशात मार्गक्रमण करणारी तरुणाई, आणि सगळ्यांना जोडणारा एकच समान धागा त्या पांडुरंगाच्या भक्तीचा.

सकाळच्या गारव्यात, झांजांच्या गजरात, विठूमाऊलीच्या, ग्यानबा-तुकारामाच्या जयघोषात, साडेतीन मैलाचे अंतर अगदी सहजच पार हॊई. अंगणातल्या तुळशीवृंदावनासमोर रख्माई विठोबाच्या साजिऱ्या मूर्तींची पूजा करून त्याभोवती रिंगण करायचे. त्यावेळी बालाजी मंदिराचा सर्व परिसर ज्ञानोबा, तुकोबा आणि पांडुरंगाच्या नामात न्हाऊन जाई. पहिल्या दिवशीच्या वारीला स्पार्टन ढोल-ताशा पथकाने कडकडीत सलामी दिली.

तीन शनिवार आणि रविवारी मिळून ही वारी झाली आणि साधारण सहा-सातशे लोकांनीं तरी ह्या वारीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. प्रत्येक दिवशी भक्त मंडळींनी हरिनामात रंगून रिंगण केले आणि नंतर गाभाऱ्यात जमून अनेक सुंदर सुंदर भजनं म्हटली. नंतर आरती आणि प्रसाद वाटप होई. ह्याप्रकारे २५ जून रोजी रविवारी ही वारी पूर्ण झाली. ह्या वारीची सांगता बालाजी मंदिरात आषाढी एकादशीला, २९ जून ला रात्री झाली.

या महासोहळ्यात प्रथम सर्व धार्मिक प्रथेनुसार, मंत्रोच्चारासहित अत्यंत धीरगंभीर मंगल वातावरणात होमहवन पार पडले. होमाला नमस्कार करून, पीठाधिपती नारायणानंद स्वामीजीं चे आशिर्वाद घेतले. मग मंदिराच्या प्रांगणात छान रांगोळी काढली होती. ज्ञानेश्वर माऊलीची सुंदर पालखी सजविली होती. महिलांनी अत्यंत कमी वेळात ‘तुझ्या दारी आली .. ‘ ह्या भजनावर पावली बसविली होती. पालखीची सुरुवात महिलांनी छान महाराष्ट्री पोशाख लेवून पावली खेळत केली.

नंतर विठूच्या नामातच हा पालखीसोहळा संपन्न झाला. एका मांडवात बे एरियातील युवा चमूने आपल्या गायनाने सर्व रसिकांना भक्तिरसात न्हाऊन टाकले. विठ्ठल मंदिरात अभिषेक, भगवंताचे ऐश्वर्य स्नान सुरु झाले. पंचामृताचा पूर लोटला होता. मग पूजाविधी व वस्त्रालंकार लेवून अत्यंत दैदिप्यमान, नेत्रदीपक मूर्तीही दर्शनोत्सुक भक्तांच्या भेटीसाठी कटेवरी कर घेउन विटेवरी उभ्या झाल्या होत्या.

त्या पाउलांवर माथे टेकून, मिळालेल्या आनंदाचे ऋण व्यक्त करून, 'मागणे नोहे आता 'हा भाव मनोमनी व्यक्त करून, सर्वेत्र: सुखिन: सन्तु! ची इच्छा करून, आळंदीच्या वारकऱ्यासारखाच आनंदाचा, सुखाचा ठेवा सोबत घेऊन प्रत्येक भक्त बाहेर पडला.

सातासमुद्रापार पहिल्यांदाच केलेल्या ह्या वारीचा अनुभव अतिशय समृद्ध होता. कुठल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता जमलेला हा वैष्णवांचा मेळा पाहून मन सुखावत होते. मुख्य म्हणजे इथे राहणाऱ्या मुलांना ऐकून माहीत असलेले टिळा, पताका, टाळ, वारकरी म्हणजे काय हे प्रत्यक्ष पहायला मिळाले.

बे एरिया महाराष्ट्र मंडळातील कार्यकर्त्यांनी अतिशय शिस्तीत हा सोहळा पार पाडला. प्रामुख्याने उल्लेख करावा वाटतो तो म्हणजे बालाजी मंदिरातील पीठाधिपती नारायणानंद स्वामीजींचा. वारीच्या ह्या संपूर्ण काळात त्यांनी खूप मोठा आधार, मागदर्शन दिले. अतिशय शांत असलेले त्यांचे व्यक्तिमत्व सर्वच भाविकांना भावले. हे मंदिर त्यांनी सर्व भक्तांसाठी खुले केले.

तंत्रज्ञानाची पंढरी असेलेल्या ह्या सिलीकॅान व्हॅलीतील वारीला मीडियानेही उचलून धरले. चार मिलीअनपेक्षा अधिक likes आणि हजारो comments आल्या. व्यक्तिगतरीत्या आलेल्या comments ची तर मोजदादच नाही. आबालवृद्धांचा ह्या वारीतील सहभाग आणि मुख्य म्हणजे तरुणाईने हिरीरीने केलेले सर्व नियोजन नक्कीच पुढे ही वारीची परंपरा आता दरवर्षी अशीच राहणार ह्याची ग्वाही देत होती.

बोला, 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com