होय, आम्ही चुकलो..- मार्क झुकेरबर्ग

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

'आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचे उल्लंघन झाले आहे, त्यासाठी मी तुमची माफी मागतो.'

- मार्क झुकेरबर्ग 

नवी दिल्ली : फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी अखेरीस केंब्रिज अॅनालिटिका कंपनीने फेसबुक वरून चोरलेल्या माहिती प्रकरणी काल भाष्य केले. फेसबुकवरच पोस्ट शेअर करत त्यांनी या प्रकरणासंदर्भात स्पष्टीकरण दिले.  

'आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचे उल्लंघन झाले आहे, त्यासाठी मी तुमची माफी मागतो. युजर्सची माहिती सुरक्षित ठेवणे ही प्राथमिक जबाबदारी आम्ही योग्यरितीने पूर्ण करू शकलो नाही, तर आम्ही कोणत्याही प्रकारची सेवा देण्याच्या क्षमतेचे नाही.' असे मत झुकेरबर्ग यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर अशी चूक पुन्हा होणार नाही अशी कबुली देखील त्यांनी दिली. 

2016 मध्ये झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांना मदत केली होती. या कंपनीने फेसबुकवरील पाच कोटी युजर्सची वैयक्तिक माहिती चोरली व या निवडणुकीत वापरली, असा आरोप करण्यात आला. या प्रकरणी झुकेरबर्गला ब्रिटनच्या संसदीय समितीने समन्सही बजावले आहे. या प्रकरणात फेसबुकच्या विश्वासार्हतेलाही तडा गेला आहे. या पार्श्वभूमीवर झुकेरबर्गने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन केंब्रिज अॅनालिटिका वादावर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच या पोस्टमध्ये त्यांनी चूक झाल्याचे मान्य केले आहे. 

माहिती सुरक्षित रहावी यासाठी आम्ही पूर्वी पासून प्रयत्न करत आलो आहोत. या प्रकरणात नेमके काय झाले हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी करत असून असा प्रकार पुन्हा होणार नाही, यासाठी पुढील पावले देखील आम्ही उचलत आहोत. 

२०१५ मध्ये केंब्रिज विद्यापीठामधील रिसर्चर अलेक्झांडर कोगनने त्याच्या अॅपद्वारे मिळवलेली माहिती ‘केंब्रिज अॅनालिटिका’ला दिल्याचे समोर आले. यानंतर आम्ही तातडीने कोगनच्या अॅपवर बंदी टाकली. तसेच कोगन आणि केंब्रिज अॅनालिटिकानेही त्यांना फेसबुकवरून मिळालेली माहिती डिलीट करावी, अशा वारंवार सूचना करूनही त्यांनी डेटा डिलीट केला नाही, हे गेल्या आठवड्यात समोर आल्यानंतर आम्ही केंब्रिज अॅनालिटिकावरही बंदी घातली, असे झुकेरबर्गयांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mark Zuckerberg admits mistakes breaks silence on Facebook data scandal