मॉरिशसमध्ये 4000 टन इंधन गळतीमुळे आणीबाणी; फ्रान्सकडे मागितली मदत 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 August 2020

जेव्हा जेव्हा जैवविविधता धोक्यात येईल तेव्हा तात्काळ हालचाल करण्याची गरज आहे. अशावेळी फ्रान्स नक्कीच पुढे असेल आताही या संकटात आम्ही मॉरिशसच्या लोकांसोबत आहे असं फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल यांनी म्हटलं आहे.

जोहान्सबर्ग: जपानच्या (japan) जहाजातून काही दिवसांपासून इंधनगळती होत असल्याने मॉरिशस (Mauritius) सरकारने पर्यावरण आणीबाणी जाहीर केली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या भागात इंधन पसरल्याचे उपग्रहाच्या छायाचित्रात आढळून आल्याने पंतप्रधान प्रवींड जुगन्नाथ यांनी पर्यावरण आणीबाणी जाहीर केली. या जहाजात सुमारे ४ हजार टन इंधन होते, असे मॉरिशसने म्हटले आहे.

फ्रान्सने (france) गळती रोखण्यासाठी मदत करावी, असे आवाहन मॉरिशसनच्या पंतप्रधानांनी केले आहे. पंतप्रधान जगन्नाथ यांनी याआधी म्हटलं होतं की, त्यांच्या सरकारने मदतासाठी  फ्रान्सला विनंती केली आहे. गळतीमुळे देशातील 13 लाख लोक धोक्यात आहेत. हे सर्व लोक पर्यटनावर अवलंबून आहेत.

सध्या कोरोना व्हायरसमुळे आधीच सगळं ठप्प झालं आहेत आणि त्यात ही आपत्ती कोसळली आहे. अशा परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनासाठी आमच्याकडे कुशल आणि तज्ज्ञांची कमतरता आहे. त्यामुळेच फ्रान्सकडे आणि राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रो यांच्याकडे मदतीचं आवाहन केलं आहे. 

हे वाचा - अमोनियम नायट्रेट - वरदायी आणि विनाशकारीही

खराब वातावरणामुळे इथं सध्या काम करणं कठीण आहे आणि पुढे काय होणार याची चिंता आहे. वातावरण बिघडलं तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते असंही पंतप्रधान जगन्नाथ यांनी म्हटलं.

फ्रान्सचे रियूनियन हे बेट मॉरिशिअसच्या जवळ आहे. फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, फ्रान्स मॉरिशिसचा मुख्य परदेशी गुंतवणूकदार आहे. त्यांच्या मोठ्या व्यापारांमध्ये भागिदार आहे. मॉरिशसच्या पंतप्रधानांनी एमव्ही वाकाशियो जहाजाचा फोटो शेअर केला असून ते एका बाजुला झुकल्याचं दिसत आहे. हवामान विभागानेही इशारा देत समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. 

मॉरिशिअसने मदतीचं आवाहन केल्यानंतर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी हवी ती मदत करू असं म्हटलं आहे. जेव्हा जेव्हा जैवविविधता धोक्यात येईल तेव्हा तात्काळ हालचाल करण्याची गरज आहे. अशावेळी फ्रान्स नक्कीच पुढे असेल आताही या संकटात आम्ही मॉरिशसच्या लोकांसोबत आहे. मदतकार्यासाठी साहित्य आणि पथके पाठवत आहे असं मॅक्रॉन यांनी म्हटलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mauritius emergency pm jagannath asked help from france