esakal | ‘एमजीएम’चा खजिना ‘ॲमेझॉन’कडे
sakal

बोलून बातमी शोधा

MGM

‘एमजीएम’चा खजिना ‘ॲमेझॉन’कडे

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - शेकडो दर्जेदार चित्रपट (Movie) आणि लघुपटांचा (Documentary) मालकी हक्क असलेल्या ‘एमजीएम’ (MGM) स्टुडिओची खरेदी करण्याची तयारी ॲमेझॉन कंपनीने (Amazon Company) दाखविली असून ८ अब्ज ४५ कोटी डॉलरला हा खरेदी व्यवहार होणार आहे. गेल्या काही काळात ‘ॲमेझॉन प्राइम’च्या माध्यमातून ऑनलाइन स्ट्रिमिंगच्या क्षेत्रात प्रचंड दबदबा निर्माण केलेल्या ॲमेझॉनच्या हाती या खरेदी व्यवहारामुळे चित्रपटांचा प्रचंड मोठा साठा लागणार आहे. (MGMs Treasure Trove to Amazon)

१७ एप्रिल १९२४ ला स्थापना झालेल्या, म्हणजेच शतकाकडे वाटचाल करत असलेल्या मेट्रो गोल्डविन मेयर, म्हणजेच ‘एमजीएम’ स्टुडिओबरोबर खरेदी व्यवहार करण्याबाबतचा करार झाल्याचे अॅमेझॉन कंपनीने आज जाहीर केले. ऑनलाइन स्ट्रिमिंग क्षेत्रात सध्या ॲमेझॉन प्राइमला नेटफ्लिक्सची मोठी स्पर्धा आहे. या करारानंतर ‘ॲमेझॉन प्राइम’ची ताकद वाढणार आहे. ऑनलाइन विक्री आणि क्लाऊड कॉम्प्युटिंगमध्ये ॲमझॉनचा व्यवसाय तेजीत असून मनोरंजन क्षेत्रातही त्यांच्या ग्राहकसंख्येचा आलेख उंचावतच आहे. हॉलिवूडमध्ये प्रतिष्ठा असलेल्या ‘एमजीएम’ स्टुडिओज्‌ची मालकी गेल्या काही वर्षांत अनेक वेळा बदलली. या काळात स्टुडिओ कर्जबाजारीही झाला. त्याचाच परिणाम म्हणून हा खरेदी व्यवहार झाल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा: ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात'

या खरेदी व्यवहारामुळे ‘एमजीएम’कडे असलेले जगप्रसिद्ध ‘जेम्स बाँड’बरोबरच, ‘रॉकी’, लिगली ब्लाँड’ यासारख्या चित्रपटांचे आणि अनेक लोकप्रिय टीव्ही शो चे हक्क अॅमेझॉनकडे येणार आहेत. ॲमेझॉन प्राइमचा वापर जगभरातील १७ कोटी ५० लाख जण वापर करतात. ‘एमजीएम’कडील दर्जेदार चित्रपट अॅमेझॉनच्या ताब्यात आल्यावर या ग्राहकसंख्येत आणखी वाढ होऊन ऑनलाइन स्ट्रिमिंग क्षेत्रात त्याचा आधीपासूनच असलेला दबदबा आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त होतो आहे.

‘एमजीएम’कडील खजिना

  • ४००० + - चित्रपट (ट्वेल्व्ह अँग्री मॅन, बेसिक इन्स्टिक्ट, क्रीड, जेम्स बाँड, मूनस्ट्रक, रोबोकॉप, रॉकी, सायलेन्स ऑफ द लॅम्ब, मॅग्निफिसंट सेव्हन, द पिंक पँथरसह इतर शेकडो)

  • १७,००० - टीव्ही शो (द हँडमेड्‌स टेल, फार्गो, वायकिंगसह अनेक)

  • १८० - ऑस्कर विजेत्या कलाकृती

  • १०० - एमी विजेत्या कलाकृती

या करारामागील खरे आर्थिक मूल्य हे एमजीएमकडे असलेल्या चित्रपटांच्या खजिन्यात आहे. या खजिन्याचा फेरवापर करण्याचे आमचे नियोजन आहे. हा खजिना आम्ही जतन करतानाच तो लोकांपर्यंत पोहोचविण्याचाही प्रयत्न करू.

- माइक हॉपकिन्स, उपाध्यक्ष, प्राइम व्हीडिओज्‌