मियाँ खलिफाचं पुन्हा ट्विट; सरकारला अप्रत्यक्षपणे म्हटली 'फॅसिस्ट'

टीम ई-सकाळ
Sunday, 7 February 2021

अमेरिकन पॉप सिंगर रिहाना, पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि मियाँ खलिफा यांनी भारतातील शेतकरी आंदोलनावर आवाज उठवल्यानंतर देशात सोशल मीडियावर विरोधाचं वादळ उठलं होतं.

Mia Khalifa : भारतातील शेतकरी आंदोलनावर आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवणाऱ्या मियाँ खलिफा हिनं ट्विटरच्या माध्यमातून आणखी एक व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका मांडलीय. या व्हिडिओच्या माध्यमातून तिच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न तिनं केलंय. शेतकऱ्यांना पाठिंब्यावर आपण ठाम असल्याचं यातून तिनं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. #FarmersProtests या हॅश टॅग खाली तिनं हा व्हिडिओ शेअर केलाय. मियाँ खलिफा एकेकाळी पॉर्न स्टार होती. मात्र, त्या इंडस्ट्रिला सोडून देत ती सध्या सामान्य जीवन जगत आहे. जेवणाच्या ताटाचा फोटो शेअर करताना मियाँनं, Shoutout to the farmers असं म्हटलंय.

तिघीही भूमिकेवर ठाम
अमेरिकन पॉप सिंगर रिहाना, पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि मियाँ खलिफा यांनी भारतातील शेतकरी आंदोलनावर आवाज उठवल्यानंतर देशात सोशल मीडियावर विरोधाचं वादळ उठलं होतं. या तिघींना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. हा देशातील अंतर्गत प्रश्न असून, तुम्ही यात लक्ष घालू नका, अशा आशयाचा सल्ला या तिघींना सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आला. सोशल मीडियावर देशभरातील अनेक सेलिब्रिटिंनी आवाज उठवत, या तिघींना प्रत्युत्तर दिलं. पण, तिघींनी पुन्हा पुन्हा आपली भूमिका स्पष्ट करून, त्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलंय.

काय म्हणाली मियाँ?
मियाँ खलिफानं ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून, आपण शेतकऱ्यांसाठी ठाम भूमिका घेत असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलंय. या तिघींनी सोशल मीडियातून एक प्रकारे प्रोपगंडा केल्याचा आरोप भारतातील अनेक सेलिब्रिटिंनीस, मोदी सरकारच्या समर्थकांनी आणि शेतकरी आंदोलनाला विरोध करणाऱ्यांनी केला होता. त्याला उत्तर देताना मियाँनं म्हटलं की, मी प्रोपगंडा केल्याची माझ्यावर टीका झाली. त्या प्रोपगंडासाठी मला काय काय मिळालंय बघा. मस्त भारतीय मेजवाणी आणि हे गुलाबजामून. समोसाही आहे. मला समोसा प्रचंड आवडतो. फक्त समोस्यावर तुम्ही मला जिंकू शकता, इतका तो मला प्रिय आहे. रोज एक गुलाब तुम्हाला फॅसिस्ट लोकांपासून दूर ठेवतो, असं लिहित तिनं, सरकारला अप्रत्यक्षपणे फॅसिस्ट म्हटलंय.
 

कोणाला केलं टॅग?
ट्विट करताना मियाँनं,  #FarmersProtests हा हॅश टॅग वापरलाय. त्याचवेळी तिनं लेखिका रुपी कौर हिला ट्विटमध्ये टॅग केलंय. तिच्याकडून मिळालेल्या जेवणासाठी रुपीचे आभार मानले  आहेत. तर, कॅनडातील नेते, जगमीत सिंह यांचे गुलाब जामूनसाठी आभार मानले आहेत. सोशल मीडियावर प्रपोगंडा तयार करण्यासाठी ही मेजवानी मिळालीय. असं मियाँ व्हिडिओमध्ये म्हणते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mia khalifa tweet farmers protest meal samosa gulab jamun