समभाग विक्रीतून नाडेला मालामाल

वृत्तसंस्था
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मायक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी त्यांच्याकडे असलेले कंपनीचे एक तृतीयांश समभाग विकून 3.5 कोटी डॉलर मिळविले आहेत. 
 

वॉशिंग्टन : मायक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी त्यांच्याकडे असलेले कंपनीचे एक तृतीयांश समभाग विकून 3.5 कोटी डॉलर मिळविले आहेत. 

नाडेला यांनी 3 लाख 28 हजार समभाग विकले. शेअर बाजारात कंपनीचा समभाग विक्रमी पातळीवर गेल्याने त्यांना प्रतिसमभाग 109.08 ते 109.68 डॉलर मिळाले. शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, नाडेल यांना समभाग विक्रीतून 3.5 कोटी डॉलरपेक्षा अधिक मिळाले. मागील वर्षभरात मायक्रोसॉफ्टचा समभाग 53 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. या आठवड्यात समभाग 109 डॉलरवर बंद झाला. कंपनीचा समभाग 25 जुलैला 110.83 डॉलरच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर गेला होता. 

नाडेला हे 50 वर्षांचे असून, त्यांच्याकडे कंपनीचे 7 लाख 78 हजार 596 समभाग आता शिल्लक आहेत. त्यांनी मूळ वेतनाच्या पंधरापट समभाग स्वत:कडे ठेवणे आवश्‍यक आहे. त्यांचे वार्षिक वेतन मागील वर्षी 14.5 लाख डॉलर होते आणि त्यांना वेतन व भत्ते यातून मिळालेली एकूण रक्कम 2 कोटी डॉलर होती. 

नाडेलांच्या काळात भाव तिप्पट 
नाडेला यांनी फेब्रुवारी 2014 मध्ये कंपनीची धुरा हाती घेतली. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीच्या समभागाचे मूल्य तिप्पट झाले आहे. याआधी 2016 मध्ये नाडेला यांनी समभाग विक्री केली होती. त्या वेळी त्यांना प्रतिसमभाग 58 डॉलर भाव मिळाला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Microsoft CEO Satya Nadella Sells Shares