आतापर्यंतची सर्वात मोठी चाचणी; 30 हजार जणांना दिली कोरोना लस 

कार्तिक पुजारी
Monday, 27 July 2020

जगातील सर्वात मोठी कोविड-19 लसीची मानवी चाचणी सोमवारपासून सुरु झाली आहे. मोडर्ना कंपनीने बनवलेली लस सोमवारी 30 हजार जणांना देण्यात आली आहे.

वॉशिंग्टन- जगातील सर्वात मोठी कोविड-19 लसीची मानवी चाचणी सोमवारपासून सुरु झाली आहे. मोडर्ना कंपनीने बनवलेली लस सोमवारी 30 हजार जणांना देण्यात आली आहे. मोडर्ना कंपनी कोरोना विषाणूवरील लस निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. मोडर्नाने बनवलेली लस कोरोना विषाणूवर प्रभावी ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, खात्रीशीर परिणाम मिळण्यासाठी आणखी चाचण्या घेण्यात येत आहेत. 

अमेरिका-चीन संबंधांचे काटे उलट्या दिशेने
स्वयंसेवकांवर कोरोना लसीचा अभ्यास करण्यात आला होता.  यात काही स्वयंसेवकांना खरी लस टोचण्यात आली, तर काहींना डमी लस टोचण्यात आली. यावरुन त्या गटामध्ये कोणते परिणाम दिसून येतात हे पाहिलं जात आहे. हा अभ्यास विशेष करुन कोरोना विषाणूने सर्वाधिक प्रभावित असलेल्या क्षेत्रांमध्ये घेण्यात आला. मोडर्नाच्या पहिल्या चाचणीमध्ये 45 स्वयंसेवकांना लस देण्यात आली होती. या स्वयंसेवकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. शिवाय काही स्वयंसेवकांमध्ये ताप आणि लस टोचलेल्या जागी दुखणे असे साधारण दुष्परिणाम दिसून आले होते.

अमेरिकेने वेगाने कोविड-19 वरील लसीचे परिक्षण सुरु केले आहे. अमेरिका प्रत्येक लसीची चाचणी आपल्या नागरिकांवर घेऊ पाहात आहे. अमेरिका प्रत्येक महिन्याला एका कंपनीची 30 हजार स्वयंसेवकांवर चाचणी घेणार आहे. या चाचण्यांमधून लस किती सुरक्षित आहे, हे तपासलं जाणार आहे. त्यानंतर वैज्ञानिक या लसींची तुलना करतील. पुढील महिन्यात ऑक्सफर्ड कंपनीच्या लसीवर चाचणी होणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये जॉनसन अँड जॉनसन कंपनी, ऑक्टोंबरमध्ये नोवावॅक्स कंपनीच्या लसीचा अभ्यास होईल. पीफीझर इंक. स्वत:हून 30 हजार स्वयंसेवकांवर अभ्यास करणार आहे. 

लोखंड आणि स्टीलच्या वापराशिवाय उभारणार राम मंदिर
तीन लसींवर विशेष नजर

अमेरिकेच्या मोडर्ना  कंपनीची mRNA 1273 लस आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेनर इंस्टिट्यूटची लस AZD1222 याची पहिली मानवी चाचणी पार पडली आहे. या लसींची चाचणी यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले आहे. या लसी देण्यात आलेल्या स्वयंसेवकांमध्ये अँटीबॉडी आणि किलर टी-सेल्स मिळाल्या आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीचे उत्पादन करण्यासाठी भारतातील सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने अस्टेराझेनेकासोबत करार केला आहे. दुसरीकडे चीनच्या कँनसिनो कंपनीच्या लसीने मानवी चाचणीचा तिसरा टप्पा गाठल्याचा दावा केला आहे. 

दरम्यान, जगभरात कोरोना विषाणूवर प्रभावी ठरेल अशी लस शोधण्यासाठी वैज्ञानिक रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. सध्या जगात 140 पेक्षा अधिक संस्था लस शोधण्याच्या कामात गुंतलेल्या आहेत. भारतातही भारत बायोटेक कंपनीची मानवी चाचणी सुरु असून लस पहिल्या टप्प्यात आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: moderna company gave corona vaccine to 30 thousand people