आली रे आली कोरोनाची लस आली! मॉडर्ना कंपनीची मोठी घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 30 November 2020

कोरोना लशीसंबंधी मोठी बातमी हाती येत आहे.

वॉशिंग्टन- कोरोना लशीसंबंधी मोठी बातमी हाती येत आहे. लस निर्मितीमध्ये आघाडीवर असणारी मॉडर्ना कंपनीची लस 94 टक्के प्रभावी ठरली आहे. कंपनी लवकरच लशीच्या आपातकालीन वापरासाठी अमेरिकेच्या अन्न आणि औषध नियामक मंडळ आणि यूरोपच्या मेडिकल एजेंसीकडे अर्ज करणार आहे. 

मॉडर्ना लशीच्या अंतिम चाचण्यांमध्ये परिणामकारक रिझल्ट मिळाले आहेत. लस 94 टक्के प्रभावी सिद्ध होत असून कोणत्याही स्वयंसेवकावर दुष्परिणाम दिसून आले नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. लशीचे अंतिम रिझल्ट हाती येताच कंपनीने लशीच्या आपातकालीन वापरसाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व काही सुरळीत राहिलं, तर एक ते दोन आठवड्यांमध्ये अमेरिकी नागरिकांसाठी लस उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे कोरोना लशी संदर्भातील ही मोठी घडामोड आहे. 

कंपनी लशीला मंजूरी मिळण्यासाठी अमेरिका, यूरोप आणि यूकेच्या नियामक मंडळाकडे अर्ज करत आहे. यूकेने मॉडर्नाकडून आतापर्यंत 7 मिलियन डोस मागवले आहेत, पण मार्चपर्यंत ही डिलिव्हरी होण्याची शक्यता कमी आहे. कंपनीने जगातील अनेक देशांशी करार केला असला तरी, अमेरिकेला ही लस सर्वात आधी मिळणार आहे. सध्या 2 कोटी डोस उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. 2021 पर्यंत 1 बिलियन डोस तयार करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहेत. 

भाजपला झटका! कृषी कायद्यावरुन NDAतील मित्रपक्षाने दिली साथ सोडण्याची धमकी 

मॉडर्ना कंपनीसोबतच ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि फार्मा कंपनी अॅस्ट्राझेनेका बनवत असलेली कोविड-19 लस अंतिम टप्प्यात आहे. अॅस्ट्राझेनेका येत्या काही दिवसात लशीच्या मंजूरीसाठी अर्ज करु शकते. भारतात सीरम इन्स्टिट्यूटने अस्ट्राझेनेकाशी करार केला आहे. त्या अंतर्गत भारतातील पुणे शहरात लशींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जात आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दोन आठवड्यांमध्ये लशीच्या आपातकालीन वापरासाठी अर्ज करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. त्यामुळे भारतीयांसाठी कोविशिल्ड लस उपलब्ध होऊ शकते.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moderna to request an Emergency Use Authorization from the US FDA