कोविड-१९ लशीला मोनोक्लोनल अँटिबॉडी ठरु शकतात पूरक!

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 24 August 2020

औषध कंपन्या, सरकारे आणि शैक्षणिक संस्थांना मोनोक्लोनल अँटिबॉडीजचा वापर करण्याचा आग्रह जगभरातील वैज्ञानिक करत आहेत.

नवी दिल्ली- औषध कंपन्या, सरकारे आणि शैक्षणिक संस्थांना मोनोक्लोनल अँटिबॉडीजचा वापर करण्याचा आग्रह जगभरातील वैज्ञानिक करत आहेत. जीवघेण्या आजारातून लढण्यासाठी कमी ते मध्यम उत्पन्न गटातील देशांनी या मोनोक्लोनल अँटिबॉडीजचा वापर करावा असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. 

विश्लेषण: कोरोनाचा लॉकडाऊन म्हणजे सरकारची आंधळी कोशिंबीर?

जगभरात गेल्या ३० वर्षात जवळजवळ १२० अँटिबॉडीजला मान्यता मिळाली आहे. कोरोना विषाणू रोगासह कर्करोगासारखा जीवघेणा रोग रोखण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मोनोक्लोनल अँटिबॉडीज वापरल्या जाऊ शकतात. सध्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणित मोनोक्लोनल अँटिबॉडीज युरोप, अमेरिका आणि कॅनाडामध्ये विकल्या जातात. दुसरीकडे २० टक्के प्रमाणित मोनोक्लोनल अँटिबॉडीज ९० टक्के लोकसंख्या असलेल्या देशात वापरल्या जातात. 

मोनोक्लोनल अँटिबॉडीजची उपलब्धता आणि परवडणे या दोन गोष्टी त्याच्या उपलब्धतेमधे अडथळा निर्माण करतात. भारतासारख्या मध्यम उत्पन्न असलेल्या देशात मोनोक्लोनल अँटिबॉडीज खूप कमी प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे कर्करोगावर प्रभावी ठरणारी ही अँटिबॉडी उपचार पद्धती भारतात उपलब्ध नाही. तज्ज्ञांच्या मते मोनोक्लोनल अँटिबॉडी कोरोना लशीला पूरक ठरु शकतात. विशेष करुन वय किंवा वैद्यकीय स्थितीमुळे ज्यांना लस घेणे शक्य नाही, अशांना याचा फायदा होऊ शकतो.

मोनोक्लोनल अँटिबॉडीज कोरोना विषाणूला रोखू शकतात का, याबाबत अमेरिकेत चाचण्या घेतल्या जात आहेत. भारतात अन्न आणि औषध विभागाने मागील महिन्यात पहिल्या स्वदेशी सोरायसीस औषधाला कोरोना रुग्णावर वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार गंभीर कोरोना रुग्णांवर याचा काय परिणाम होतो हे पाहिलं जात आहे. भारताच्या विविध भागात याचे परिक्षण केले जात आहे.

चीन विरुद्ध सर्व पर्याय खुले: जनरल बिपीन रावत यांचा इशारा

मोनोक्लोनल अँटिबॉडीजमुळे कर्करोगांच्या रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यात मोठी मदत झाली आहे. त्यामुळे याचा अन्य रोगावरही प्रभावी वापर केला जाऊ शकतो का, हे तपासलं जात आहे. असे असले तरी मोनोक्लोनल अँटिबॉडीज या सर्वात महाग औषधी उत्पादन आहेत. कर्करोगाच्या रुग्णाला दर तीन आठवड्याला मोनोक्लोनल अँटिबॉडीजचे इंजेक्शन देण्यासाठी तब्बल ३ लाख रुपये मोजावे लागतात. त्यामुळे याबाबत जागरुकता निर्माण करुन याचे उत्पादन वाढवल्यास याचा सर्वांना लाभ घेता येईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

काय आहेत मोनोक्लोनल अँटिबॉडीज?

मोनोक्लोनल अँटिबॉडीज या लॅबमध्ये बनवण्यात आलेली प्रथिने असतात. ही प्रथिने रोगाविरोधात लढण्यासाठी नैसर्गिक अँटीबॉडीप्रमाणे काम करत असतात. मानवी शरिरातील रोगप्रतिकारक पेशींपासून उत्पन्न झालेली प्रथिने विशेषता कर्करोगाच्या पेशींविरोधात यशस्वीरित्या लढा देतात. शिवाय विषाणू आणि बॅक्टेरियांविरोधात लढण्यासाठी शरिराची क्षमता वाढवतात. त्यामुळे याचा वापर कोरोना विषाणूला रोखण्यासाठीही केला जाऊ शकतो.
 

(edited by- kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monoclonal antibodies to Covid vaccine can be a supplement