'बोलणार नसतील तरच जास्त महिलांना बैठकीला प्रवेश'

टीम ई सकाळ
Wednesday, 17 February 2021

लिंगभेदी वक्तव्यामुळे ऑलिंपिक संयोजन समितीच्या प्रमुखांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर जपानमध्ये महिलांची खिल्ली उडविणाऱ्या आणखी एका वक्तव्याची नोंद झाली.

टोकियो - लिंगभेदी वक्तव्यामुळे ऑलिंपिक संयोजन समितीच्या प्रमुखांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर जपानमध्ये महिलांची खिल्ली उडविणाऱ्या आणखी एका वक्तव्याची नोंद झाली. सत्ताधारी पक्षाच्या ज्येष्ठ पुरुष नेत्यानेच हे वक्तव्य केल्यामुळे वादात भरच पडली. निक्केई या आघाडीच्या वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) या सत्ताधारी पक्षाचे सरचिटणीस तोशिहीरो निकाई यांनी म्हटले आहे की, बैठकांना जास्त महिला येऊ शकतात, फक्त त्या जास्त बोलणार नसतील तर.

बोलायचे नाहीच...
महिलांना संधी देण्यासाठी या पक्षाची भूमिकाच निकाई यांनी जाहीर केली, पण त्यातही उघड भेदभाव दिसतो. संसदेच्या सदस्य असलेल्या पाच महिला पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित राहू शकतात. त्या महिला निरीक्षक असतील, पण त्यांना मत मांडता येणार नाही. त्यांना सचिवालयात ते स्वतंत्रपणे सादर करावे लागेल.

हेहीे वाचा - ऑस्ट्रेलियाच्या संसदेत महिलेसोबत दुष्कर्म; पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मागितली माफी

काय म्हणाले मोरी
ऑलिंपिक समितीचे प्रमुख योशिरो मोरी यांनी गेल्याच आठवड्यात महिलांचा अवमान करणारे वक्तव्य केले. बैठकांमध्ये महिला फारच बडबड करतात. त्यामुळेच त्यांना मायदेशात तसेच परदेशात दीर्घकाळापासून टीकेला सामोरे जावे लागत आहे, असे ते म्हणाले होते. मोरी हे ८३ वर्षांचे असून त्यांनी पंतप्रधानपदही भूषविले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तीव्र टीका झाली. अखेरीस त्यांना राजीनामा द्यावा लागला.

हे वाचा - तब्बल एका वर्षानंतर दिसून आली किम जोंग उनची बायको; गर्भवती असल्याची चर्चा

आधी समजून तरी घ्या
निकाई यांनी सांगितले की, महिला सदस्यांनी पक्षाच्या निर्णयप्रक्रियेकडे बारकाईने पाहायला हवे. कोणत्या प्रकारची चर्चा होती हे त्यांनी पूर्णपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. जे काही चालते ते काय असते हे त्यांना पाहावे. सत्ताधारी पक्षाच्या संचालक मंडळात पुरुषांचे वर्चस्व असल्याची टीका होते. यासंदर्भात निकाई यांनी स्पष्ट केले की, हे माझ्या कानावर आले आहे, पण मंडळाचे सदस्य निवड झालेले असतात. 

न्यूझीलंडमधील वैकाटो विद्यापीठातील सांस्कृतिक समाजशास्त्र विषयातील तज्ज्ञ बेलिंडा व्हिटन यांनी या वृत्तावर सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केली. लोक केवळ जनसंपर्काचा देखावा म्हणून महिलांना घेतील, असे त्या म्हणाल्या. त्याचवेळी सर्वांनी स्वतःला विचारायला हवा असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

येथे मात्र जपानची पिछाडी
जगात अनेक क्षेत्रांत जपान आघाडीवर आहे, मात्र जागतिक आर्थिक परिषदेच्या (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) जागतिक लिंग तफावत निर्देशांकात (ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स) जपानची पिछाडी आहे. १५३ देशांत जपानचा १२१वा क्रमांक आहे, जो प्रगत देशांमध्ये सर्वांत कालचा आहे. आर्थिक आघाडी आणि राजकीय सबलीकरणातील महिलांना सहभागाच्या संधीवर हा निर्देशांक ठरतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more women at meetings unless they talk say Japan s ruling party