रडणाऱया आईचा हा फोटो व्हायरल का होतोय...?

रडणाऱया आईचा हा फोटो व्हायरल का होतोय...?

आईपण नेमकं काय असतं? मेलबोर्नमधील रॅचेल गॅमपेट्रो या 28 वर्षे वयाच्या आईला विचारा. तिचा फोटो गेले आठवडाभर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऑस्ट्रेलियातील या फोटोने आता युरोपमध्येही लोकांना वेड लावले आहे. रॅचेलने जगभरातील प्रत्येक आईची भावना फोटोतून मांडली असल्याची भावना व्यक्त होत आहे. आता या फोटोला 'प्रामाणिक आई' असे नाव युजर्सनी देऊ केले आहे. 

रॅचेल ब्लॉगर आहे. तिचा मुलगा ल्क्यूकस चार वर्षे वयाचा आहे. रॅचेलला नुकतीच मुलगी झाली आहे. तिचं नाव आहे बेला. रॅचेल आता दोन चिमुकल्यांची आई आहे. एरव्ही रॅचेल पर्फेक्ट फोटोसाठी धडपडते. कुटुंब म्हणून आपला सर्वोत्तम फोटो सोशल मीडियावर गेला पाहिजे, यासाठी आग्रही असते. व्हायरल झालेला तिचा फोटो मात्र अतिशय वेगळा आणि हेलावणारा आहे. बेलाच्या जन्मानंतरच्या तिसऱया दिवशी रॅचेलचा नवरा कामावर गेला होता आणि ती घरी मुलांसोबत एकटी होती. तेव्हा तिने जी सेल्फी घेतली, ती आज लाखो नेटिझन्सच्या हृदयाला हात घालते आहे. 

काय आहे रॅचेलच्या फोटोत?
रॅचेल सांगते, प्रत्येक कुटुंब आपण किती पर्फेक्ट आहोत, हे दाखविण्याची धडपड सोशल मीडियावर करते. लहान मुलांचे छान छान गोंडस फोटो, शाळेतले कार्यक्रम आणि स्लीम-फीट आई फोटोत दिसतेच दिसते...हे फोटो मी पाहते, तेव्हा मला माझ्याविषयीच वाईट वाटतं. आम्ही आया इतक्या काही छान छान नसतो. घरातल्या कोचवर पायजम्यामध्ये आम्ही पसरलेल्या असतो. मुलांचं सगळं नीट व्हावं म्हणून धावाधाव करताना आम्ही दमून जात असतो. तरीही त्यांना सर्वोत्तम मिळावं, म्हणून प्रयत्न करत असतो. 

'त्या दिवशी आम्ही सगळेच दमलेलो होतो. ल्युकसनं त्याचा खोडकरपणा करून करून दमवलं होतं. काय करायचं मला सुचत नव्हतं. थोड्या वेळात तो शेजारी आला आणि झोपून गेला. एका कुशीत बेला होती. शेजारी ल्युकस झोपलेला होता. मला अचानक भरून आलं. मुलांसाठी खूप काही करायला हवंय...आणि आपल्याला जमत नाहीय, अशी खंत मनात दाटून आली...एकीकडे असह्य दमणूक आणि दुसरीकडे ही भावना...माझ्या डोळ्यातून पाणी ओघळू लागले...', रॅचेल सांगते. 

रॅचेलने हाच क्षण सेल्फीमध्ये टिपला. दोन मुलांची रडणारी आई, असा हा फोटो पाहता पाहता व्हायरल झाला. आईपणाच्या यातनांबद्दल कोणीच काही बोलत नाही, या भावनेतून रॅचेलने फोटोसोबत लिहिले, आईपणाचा निराश करणारा क्षण...जो कुणालाच शेअर करायचा नसतो...!

रॅचेलने आईपणाचं कुठलंही अवडंबर न माजविता त्या क्षणाची प्रामाणिक भावना सोशल मीडियावर शेअर केली आणि तीच लाखो लोकांना भावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com