esakal | रोहिंग्या मुस्लिमांची शोकांतिका! म्यानमार करतंय त्यांच्या वास्तव्याचे पुरावे नष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Rohingya_muslims.jpg

२०१७ मध्ये झालेल्या नरसंहारात ७,३०,००० रोहिंग्यांनी देश सोडून पलायन केले. संयुक्त राष्ट्राने याला वांशिक नरसंहार म्हटले होते. 

रोहिंग्या मुस्लिमांची शोकांतिका! म्यानमार करतंय त्यांच्या वास्तव्याचे पुरावे नष्ट

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नायपाईडाव- तीन वर्षांपूर्वी म्यानमार लष्कराने 'कान क्या' नावाचं संपूर्ण गाव जाळून टाकत त्यावरुन बुलडोझर फिरवला होता. मागीलवर्षी म्यानमारने या गावाचे नाव देशाच्या अधिकृत नकाशावरुन बदललं आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्राने दिली आहे. नाफ नदीपासून ५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावात अनेक लोक राहात होते. मात्र, २०१७ मध्ये झालेल्या नरसंहारात ७,३०,००० रोहिंग्यांनी देश सोडून पलायन केले. संयुक्त राष्ट्राने याला वांशिक नरसंहार म्हटले होते. 

कान क्या गाव ज्याठिकाणी स्थित होतं, त्याठिकाणी आता लष्कराचे तळ आहेत. याठिकाणी डझनभर सरकारी आणि लष्करी इमारती उभारण्यात आल्या आहेत. शिवाय येथे पोलिसांचे तळही उभारण्यात आल्याचे उपग्रह छायाचित्रांमधून उघड होत आहे. हे गाव बांगलादेश सीमेपासून जवळच आहे. परदेशी नागरिकांना या गावाला भेट देण्यापासून मनाई करण्यात आली आहे. गाव खूपच छोटे असल्याने गुगल मॅपवर याला स्थान देण्यात आले नाही.

WHO ने केलं पाकिस्तानचे कौतुक; इतर देशांना शिकण्याचा दिला सल्ला

संयुक्त राष्ट्र संघाच्या म्यानमारमधील गटाकडून २०२० चा नकाशा जाहीर करण्यात आला आहे. यात उद्धवस्त झालेल्या गावाचे नाव बदलण्यात आले असून त्याला शेजारील गाव मोंगजावशी याला जोडण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र निर्वासित लोकांच्या माहितीसाठी अशाप्रकारचा नकाशा तयार करत असतं. 

२०१७ मध्ये म्यानमार लष्कराने कान क्या सह ४०० गावे उद्धवस्त केली होती. उपग्रह छायाचित्रांच्या पाहणीत असं स्पष्ट झालंय की, एक डझनपेक्षा अधिक गावांची नावे बदलली आहेत. शिवाय काही गावे तर नकाशावरुन गायब करण्यात आली आहेत. 

आम्ही पुन्हा म्यानमारमध्ये परत येऊ नये म्हणून अशी कृती केली जात असल्याची प्रतिक्रिया बांगलादेशच्या निर्वासित कॅम्पमध्ये राहणाऱ्या मोहम्मद रफिक यांनी दिली. म्यानमार सरकारने यावर काही प्रतिक्रिया देणे टाळले आहे. 

अमित शहांच्या प्रकृतीबद्दल AIIMS ने दिली माहिती

२०१७ मध्ये म्यानमारच्या लष्कराने रोहिंग्या मुस्लीमांना राखाईन प्रांतातून हाकलून लावले होते. त्यामुळे लाखो रोहिंग्या मुस्लीमांना आपल्या देश सोडून इतरत्र आश्रय घ्यावा लागला. हजारो लोकांनी बांगलादेशमध्ये आश्रय घेतला असून त्यांना निर्वासित कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. रोहिग्या मुस्लिमांनी पलायन करताच म्यानमार लष्कराने ओसाड पडलेली गावे ताब्यात घेऊन तेथे लष्करी तळ उभारण्यास सुरुवात केली. तसेच याठिकाणी बौद्ध लोकांच्या राहण्यासाठी घरे बांधली जात आहेत.

दरम्यान, आरकान रोहिंग्या राष्ट्रीय संघटनेने संयुक्त राष्ट्राकडे गावांची नावे बदलली जात असल्याची तक्रार केली होती. संयुक्त राष्ट्राने म्हटलं की, रोहिंग्या मुस्लिमांनी पुन्हा देशात येऊन नये, असं म्यानमारला वाटतं. त्यामुळेच गावाची नावे बदलून आणि पुरावे नष्ट करुन निर्वासितांच्या परतण्याचे मार्ग बंद केले जात आहेत.

(edited by- kartik pujari)