NASA Artemis I mission : अंतराळात पाठवणार ‘यीस्ट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NASA Artemis I mission

NASA Artemis I mission : अंतराळात पाठवणार ‘यीस्ट’

न्यूयॉर्क : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’चे (नासा) लक्ष मानवी चांद्र मोहिमेकडे लागले आहे. मानवाला चंद्रावर उतरविण्यापूर्वी विविध उपग्रह सोडण्याची तयारी ‘नासा’ करीत आहे. यामध्ये ‘क्युबसॅट’ हा ‘बायोसेन्टिनेल’ प्रकारच्या उपग्रहाचा समावेश आहे. या उपग्रहामार्फत ‘यीस्ट’ (किण्व) अंतराळाळात पाठविण्यात येणार आहे. या माध्यमातून चंद्राभोवती पहिला दीर्घ-कालावधीचा जैवशास्त्रीय प्रयोग करण्यात येणार आहे.

‘आर्मिटेज-१’ मोहिमेअंतर्गत एकूण दहा गोष्टी (पेलोड) अवकाशात नेण्यात येणार आहेत. त्यात ‘क्युबसॅट’चा समावेश आहे. बुटांच्या खोक्याएवढा आकार व ३० पौंड वजनाच्या या उपग्रहातून ‘यीस्ट’च्या स्वरूपात सूक्ष्मजीव अंतराळात पाठविण्यात येणार आहेत. अंतराळात अगदी आतमध्ये दीर्घ कालावधीच्या प्रवासामुळे उद्‍भवणारे आरोग्याचे धोके समजून घेण्यासाठी हा प्रयोग करण्यात येणार आहे. भविष्यात मंगळावर मानव पाठविण्याच्या मोहिमेसाठी अधिकाधिक उपयुक्त माहिती मिळविणे आणि त्यानुसार योजना तयार करणे हाही एक उद्देश आहे. याचे प्रक्षेपण २९ ऑगस्ट रोजी प्रस्तावित आहे.

धोकादायक ‘स्पेस रेडिएशन’

‘स्पेस रेडिएशन’ (अवकाशातील उत्सर्जन) हे पृथ्वीबाहेरील सर्वात धोकादायक गोष्टींपैकी एक आहे. त्याचा परिणाम अतिसूक्ष्म पातळीवर होत असतो. अंतराळातून पृथ्वीकडे येणारे शक्तिशाली किरण आणि सौर कणांचा इलेक्ट्रॉनिक्स आणि जिवंत पेशींवर विपरीत परिणाम होऊ शकतो. ओरीऑन अंतराळयानात अत्याधुनिक बायोसेन्सरची सुविधा आहे. म्हणजेच अंतराळातील किरणोत्सर्गात दीर्घकाळ राहिल्यानंतर ‘यीस्ट’वर काय परिणाम होते, याचे निरीक्षण करण्यासाठी सूक्ष्म जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळा यात असेल.

‘बायोसेन्टिनल’चे कार्य

अगदी दूर गेल्यानंतर तेथील उत्सर्जित किरणांचा यीस्टवर काय परिणाम होते, यावर लक्ष ठेवणार

- पृथ्वीच्या कक्षाच्या पलीकडे उच्च किरणोत्सर्गाच्या संपर्कात आल्यानंतर यीस्टमधील चयापचय प्रक्रिया आणि यीस्ट पेशींच्या वाढीचा अभ्यासही करण्यात येणार.

- बायोसेन्टिनलचे चंद्राभोवती भ्रमण सुरू झाल्यानंतर यीस्टचा अभ्यास एक आठवडाभर करण्यात येईल.

- यीस्टचे अस्तित्व टिकवण्यासाठी अत्यंत कमी प्रमाणातील द्रव्याचा प्रवाह नियंत्रित करण्याची सोय ‘बायोसेन्टिनल’मध्ये आहे.

यीस्टची निवड का?

- मानवातील पेशींप्रमाणेच यीस्टच्या पेशींमधील जैविक हालचाल असते.

- मानवाप्रमाणाचे यीस्टमध्येही ‘डीएन’वरील आघात आणि दुरुस्तीसाठी समान यंत्रणा असते.

- अवकाशातील किरणोत्सर्गाचा मानवी शरीरावरील कसा परिणाम होईल हे समजण्यासाठी यीस्ट हे उत्तम माध्यम असल्याचा संशोधकांचा दावा

‘‘बायोसेन्टिनल हा या प्रकारातील पहिला उपग्रह आहे. ते जिवंत जिवांना पूर्वीपेक्षा अधिक दूर अंतराळात घेऊन जाईल. हे खरेच खूप छान आहे.’’

- मॅथ्यू नॅपोली, व्यवस्थापक, बायोसेन्टिनल प्रकल्प

Web Title: Nasa Artemis I Mission Yeast Will Sent Into Space Biological Experiments

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..