VIDEO - सर्व कसं आहे? पृथ्वीवर उतरताच अंतराळवीराने विचारला प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

अंतराळ स्थानकातील मोहिमेवर गेलेले तीन अंतराळवीर गुरुवारी सुरक्षित पृथ्वीवर परतले. नासाचे तीन अंतराळवीर कझाकिस्तानमधील देजकाजगन शहराच्या दक्षिण पूर्व भागात सकाळी सात वाजून 54 मिनिटांनी उतरले.

मॉस्को - गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून जगभरातील व्यवहार कोरोनामुळे ठप्प झाले होते. या काळात जगातील अनेक गोष्टींवर परिणाम झाला असून लोकांच्या रोजच्या व्यवहारात मोठा बदल झाला आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील मोहिमेवर गेलेले तीन अंतराळवीर गुरुवारी सुरक्षित पृथ्वीवर परतले. नासाचे तीन अंतराळवीर कझाकिस्तानमधील देजकाजगन शहराच्या दक्षिण पूर्व भागात सकाळी सात वाजून 54 मिनिटांनी उतरले. यामध्ये अमेरिकेच्या ख्रिस केसिडी, रशियाचे अनातोली इव्हानिशिन आणि इवान वेगनर यांचा समावेश आहे.

अंतराळातून परतलेल्या तिघांना वैद्यकीय तपासणीनंतर हेलिकॉप्टने त्यांच्या घरी पाठवण्यात येईल. कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे रशियाच्या बचाव पथकासोबत त्यांची भेट होण्याआधी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. तसंच बचाव पथकात समाविष्ट असलेल्या लोकांची संख्याही मर्यादित ठेवण्यात आली होती. 

यान सुरक्षितपणे उतल्यानंतर केसिडी हसताना दिसत होता. त्याचा व्हिडिओ नासाने शेअर केला आहे. यावेळी अमेरिकेच्या ख्रिस केसिडीने सर्व कसं आहे असा प्रश्न विचारला. तिघेही अंतराळातून परत येण्याआधी नासाचे केट रुबिन्स, रशियाचे सर्गेई रेजिकोव्हसह तिघेजण एक आठवड्यापूर्वी अंतराळ स्थानकात पोहोचले आहेत.

हे वाचा - ब्राझीलमध्ये ऑक्सफर्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीदरम्यान व्हॉलेंटिअरचा मृत्यू

दरम्यान, अंतराळातून तिघे सुरक्षित पोहोचल्यानं वैज्ञानिकांनी मोकळा श्वास घेतला आहे.
पृथ्वीवर परतलेले तीनही अंतराळवीर अंतराळात जाण्याआधी मॉस्कोच्या बाहेर त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. तेव्हा कोरोनाचा धोका त्यांना पोहोचू नये यासाठी काळजी घेण्यात आली होती. त्यानंतर तिघेही अंतराळात गेले होते. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पृथ्वीपासून 420 किमी अंतरावर असून पृथ्वीच्या कक्षेत जवळपास 17 हजार किमी प्रतितास वेगाने फिरत असते. 1999 पासून 2018 पर्यंत नासाने अशा मोहिमांमधून जवळपास 25 अभ्यास केले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NASA astronaut after returning to earth ask how are things