ब्राझीलमध्ये ऑक्सफर्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीदरम्यान व्हॉलेंटिअरचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

जगभरात अनेक देशांत कोरोना विषाणूवरील प्रभावी लशीच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु आहेत.

ब्राझील : सध्या जगभरात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. बऱ्यापैकी सगळे जग या महामारीच्या नुकसानीमुळे त्रस्त असून सगळेच कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या लशीच्या प्रतिक्षेत आहेत. जगभरात अनेक देशांत कोरोना विषाणूवरील लशीसाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र अद्याप कोणत्याही लशीला निर्विवाद असे यश प्राप्त झालेले नाहीये. एस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड यांनी बनवलेली लस ही आतापर्यंत बनलेल्या लशींच्या तुलनेत चांगली कामगिरी करत असल्याची माहिती होती. मात्र आता या लशीसंदर्भात एक नकारात्मक बाब पुढे आली आहे. 

हेही वाचा - ट्रम्प यांना स्वतःची काळजी घेता आली नाही ते आपली काय घेणार, ओबामांचा हल्लाबोल

या लशीची चाचणी जगभरात अनेक व्हॉलेंटीअर्सवर घेण्यात येत आहे. त्यातील ब्राझीलमधील एका व्हॉलेंटीअरचा मृत्यू झाला आहे, याबाबतची माहिती काल बुधवारी ब्राझीलच्या ऍन्व्हीसा या आरोग्य संस्थेने दिली. मात्र, या लशीची चाचणी तशीच सुरु राहील असंही कळवण्यात आलं आहे. चाचणी दरम्यान, व्हॉलेंटीअरला लस दिली होती की प्लेसबो शॉट याबाबत अद्याप संदिग्धता आहे. मेडीकल प्रायव्हसीचे कारण देत ऍन्व्हीसाने याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. 

या लशीच्या चाचणीतील सहभागी व्हॉलेंटीअर्सची स्वतंत्रपणे तपासणी करुन सगळ्या आवश्यक त्या महत्त्वाच्या चाचण्या करण्यात येतात. या लशीच्या चाचणीच्या सुरक्षिततेबद्दल अद्याप कसलाही धोका नसल्याने ही चाचणी सुरु ठेवली जाईल, असं या संस्थेने सांगितलं. 

हेही वाचा - पंतप्रधानांच्या लो-कट ब्लेझरमुळे वाद; नुकतचं झालंय लग्न!

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, ऍस्ट्राझेनेका या लस निर्णाण करणाऱ्या कंपनीच्या प्रवक्त्यांनी याबाबत काही वक्तव्य करण्यास नकार दिला आहे. नियमांनुसार ऑक्सफोर्ड लशीच्या या चाचणीतील वैयक्तीक केसेसबाबत आम्ही काहीही वक्तव्य करु शकत नाही. पण मी हे खात्रीने सांगू शकतो की योग्य ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. 
होपिंक्स युनिव्हर्सिटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ब्राझीलमध्ये आतापर्यंत 5,273,954 कोरोना रुग्ण सापडले आहेत. यापैकी 154,837 रुग्ण या व्हायरसमुळे दगावले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brazils COVID19 vaccine volunteer dies authorities say trial to continue