रॉ प्रमुखांच्या भेटीनंतर नेपाळ नरमले; विजयादशमीच्या शुभेच्छा देताना चूक सुधारली

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान, चीन यांच्याप्रमाणे नेपाळनेसुद्धा सीमेवरून वाद निर्माण केला होता. यामध्ये लिपुलेख, कालापानी, लिंपियाधुरा हे भाग त्यांचे असल्याचा दावा केला होता.

काठमांडू - भारतात नवरात्रौत्सवाचा उत्साह देशभरात दिसून येत आहे. नेपाळमध्येही दसऱ्याचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर भारत-नेपाळचे संबंध सुधारण्याची चिन्हे दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान, चीन यांच्याप्रमाणे नेपाळनेसुद्धा सीमेवरून वाद निर्माण केला होता. यामध्ये लिपुलेख, कालापानी, लिंपियाधुरा हे भाग त्यांचे असल्याचा दावा केला होता. 

नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी नेपाळमधील सर्व नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात विशेष म्हणजे त्यांनी जो नकाशा दाखवला आहे तो जुना आहे. त्या नकाशामध्ये नेपाळने लिपुलेख, कालापानी किंवा लिंपियाधुरा भाग त्यांचा असल्याचा उल्लेख नाही. 

नेपाळने मध्यंतरी एक नवा नकाशा मंजूर केला होता. त्यावरून भारत आणि नेपाळ यांच्यात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आता जुना नकाशा पंतप्रधान ओली यांनी शेअर केल्यानं हा तणाव निवळला असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, ओली यांच्या भूमिकेत हा अचानक बदल कसा झाला असा प्रश्नही उपस्थित होत आहे. 

दोनच दिवसांपूर्वी भारताची गुप्तचर संस्था रॉचे प्रमुख सामंत कुमार गोयल यांनी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची भेट घेतली होती. या भेटीवरून पंतप्रधान केपी ओली यांना सत्ताधारी पक्षासह इतर नेत्यांनी टार्गेट केलं होतं. गोयल यांनी बुधवारी सांयकाळी ओली यांची सरकारी निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावरून सत्तारुढ पक्षाचे नेते भीम रावल यांनी म्हटलं होतं की, रॉ प्रमुख गोयल आणि पंतप्रधान ओली यांच्यातील बैठक ही कूटनितीच्या नियमांविरुद्ध आहे. यामध्ये नेपाळचे कोणतेही हित नाही. 

हे वाचा - ‘रॉ’प्रमुखांच्या भेटीमुळे ओली यांच्यावर टीका;नेपाळमध्ये राजकीय वाद

भारताचे लष्करप्रमुख एमएम नरवने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेपाळ दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी गोयल यांची ही भेट होती. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आठ मे रोजी उत्तराखंडमधील लिपुलेख आणि धारचूला यांना जोडणाऱ्या 80 किमी मार्गाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. 

राजनाथ सिंह यांनी उद्घाटन केलेला रस्ता हा नेपाळच्या भागातून जात असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे काही दिवसांनी नवा नकाशा जारी करताना त्यामध्ये लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हे त्यांच्या हद्दीत असल्याचं दाखवलं होतं. भारतानेसुद्धा नोव्हेंबर 2019 मध्ये नवा नकाशा जारी करताना हे तिनही भाग भारताचे असल्याचं म्हटलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nepal prime minister wishes happy vijayadashami with using old map after meeting raw chief