'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 जुलै 2017

इस्राईलला भेट देणारा पहिला भारतीय पंतप्रधान ठरण्याचा हा क्षण माझ्यासाठी बहुमानाचा आहेमाझे स्वागत इतक्‍या मनापासून करणारे माझे मित्र नेतान्याहू यांचे मी मनापासून आभार मानतो...

तेल अवीव - इस्राईलच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आलेल्या भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खुद्द इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज (मंगळवार) विमानतळावर उपस्थित राहून जातीने स्वागत केले. "आप का स्वागत हैं मेरे दोस्त,' अशा आश्‍वासक शब्दांत नेतान्याहू यांनी मोदी यांचे स्वागत केले; यानंतर दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली. इस्राईलपासून काही अंतरावर असलेल्या बेन गुरिओन विमानतळावर दाखल झालेल्या मोदी यांना "रेड कार्पेट'चा मान देण्यात आला.

मोदी हे इस्राईलला भेट देणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. या पार्श्‍वभूमीवर, त्यांच्या स्वागतासाठी खुद्द इस्राईलच्या पंतप्रधानांची उपस्थिती, हा अत्यंत मोठा मान समजण्यात येत आहे. हा मान केवळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वा पोप यांनाच असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. नेतान्याहू यांच्याबरोबर इस्राईलच्या मंत्रिमंडळानेही यावेळी उपस्थित राहून मोदी यांच्या ऐतिहासिक स्वागत सोहळ्यात सहभाग नोंदविला. यानंतर विमानतळावर भारताचे राष्ट्रगीतही वाजविण्यात आले.

मोदी यांचे स्वागत करताना नेतान्याहू म्हणाले -

  • नरेंद्र मोदी हे मोठ्या जागतिक नेत्यांपैकी एक
  • इस्राईलला भारताचे पंतप्रधान प्रथमच भेट देत आहेत. तुम्ही खरे मित्र आहात. आमचे भारतावर प्रेम आहे
  • कॅलिफोर्नियामधील सिलिकॉन व्हॅली येथे एका बाबीचा कायमच उल्लेख केला जातो. तेथे हिंदी व हिब्रु या दोन्ही भाषा सगळीकडेच ऐकावयास मिळतात!
  • तुम्ही मला सांगितले होते, की इस्राईल व भारतामधील संबंधांस आकाशाचीच मर्यादा (स्काय इज दी लिमीट) आहे. परंतु आपल्या अवकाश कार्यक्रमांनी ही मर्यादादेखील ओलांडली आहे!

पंतप्रधान मोदी यांनी या मनमोकळ्या स्वागताचा आनंदाने स्वीकार करत आपली भूमिका यावेळी मांडली.

पंतप्रधान म्हणाले -

  • इस्राईलला भेट देणारा पहिला भारतीय पंतप्रधान ठरण्याचा हा क्षण माझ्यासाठी बहुमानाचा आहे
  • माझे स्वागत इतक्‍या मनापासून करणारे माझे मित्र नेतान्याहू यांचे मी मनापासून आभार मानतो
  • इस्राईलच्या जनतेने त्यांच्या राष्ट्राची बांधणी लोकशाही तत्त्वांवर केली आहे. हे राष्ट्र त्यांनी कष्ट, नावीन्याचा ध्यास अशा गुणांनी वृद्धिंगत केले आहे.
  • सर्वांगीण विकासाच्या आमच्या धोरणामध्ये इस्राईल हा अत्यंत महत्त्वाचा मित्रदेश असल्याचे आम्ही मानतो
  • भारत ही अत्यंत पुरातन संस्कृती आहे; मात्र भारत एक "तरुण राष्ट्र'ही आहे. दोन देशांमध्ये शतकानुशतके असलेल्या नात्यामुळे ही द्विपक्षीय भागीदारी विकसित होते आहे.
  • दोन्ही देशांमधील समाजांचे दहशतवादाच्या समान धोक्‍यापासून संरक्षण करणे आवश्‍यक आहे.

या छोटेखानी भाषणानंतर भारतीय पंतप्रधानांनी इस्राईलच्या सैन्यदलामधील अधिकाऱ्यांची भेट घेतली.

Web Title: Netanyahu welcoms PM Modi in Israel