
Chris Hipkins : हिपकिन्स बनणार न्यूझीलंडचे नवे पंतप्रधान
वेलिंग्टन : न्यूझीलंडचे शिक्षण मंत्री ख्रिस हिपकिन्स हे देशाचे नवे पंतप्रधान असणार आहेत. पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी राजीनामा देणार असल्याचे दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते.
त्यांच्या जागी लेबर पार्टीचा नेता निवडीच्या शर्यतीत शनिवारी हिपकिन्स (वय ४४) हे एकमेव उमेदवार असल्याने न्यूझीलंडचे नवे पंतप्रधानपदी त्यांची निवड होणार हे निश्चित मानले जात आहे.
लेबर पार्टीच्या प्रतिनिधींची बैठक रविवारी (ता.२३) होणार आहे. त्यात पक्षप्रमुख आणि पंतप्रधानपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा होण्याचा अंदाज आहे. ख्रिस हिपकिन्स हे पहिल्यांदा लेबर पार्टीकडून निवडून आले होते.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती हातळण्यासाठी नोव्हेंबर २०२२ मध्येत्यांच्याकडे मंत्रिपद देण्यात आले होते. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे हिपकिन्स यांना मोठी लोकप्रियता मिळाली. शिक्षण, सार्वजनिक सेवा आदी मंत्रिपदांबरोबरच ते सभागृहाचे नेतेही आहेत. लेबर पार्टीला त्यांनी अनेकदा राजकीय संकटांतून सहीसलामत बाहेर काढलेले आहे.
हिपकिन्स यांच्या बाजूने कौल
न्यूझीलंडमधील एका स्थानिक माध्यमाने केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ३६ टक्के नागरिकांनी पंतप्रधानपदासाठी ख्रिस हिपकिन्स यांच्या बाजूने कौल दिला आहे. सुस्वभावी व्यक्तिमत्त्वामुळेही ते लोकांमध्ये सतत चर्चेत असतात.
येथे यंदा १४ ऑक्टोबरला सर्वसाधारण निवडणूक होणार आहे. तोपर्यंत आठ महिन्यांची मुदत हिपकिन्स यांच्याकडे असून लेबर पार्टीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागणार आहेत.
एका ताज्या पाहणीनुसार लेबर पार्टीची लोकप्रियता घसरून ३१.७ टक्के झाला आहे. त्याचवेळी विरोधी नॅशनल पार्टीला ३७.२ टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. महागाई, गरिबी आणि गुन्हेगारी या मुद्यांवरून विरोधक लेबर पार्टीच्या सरकारला लक्ष्य करीत आहेत.