
Ban Cigarettes : न्यूझीलंडचे पाऊल सिगारेट हद्दपारीकडे
वेलिंग्टन : तंबाखूयुक्त सिगारेटला टप्प्याटप्प्यांत हद्दपार करण्यासाठी न्यूझीलंड सरकारने अभिनव पाऊल उचलताना किशोरवयातील मुला-मुलींना सिगारेट खरेदी करण्यास आयुष्यभरासाठी बंदी जाहीर केली आहे. तंबाखूविरोधात न्यूझीलंडने गेल्या काही वर्षांपासून कठोर धोरण स्वीकारले आहे. न्यूझीलंडमधील नव्या कायद्यानुसार, एक जानेवारी २००९ नंतर जन्मलेल्या कोणालाही सिगारेट खरेदी करण्यास मनाई करण्यात आली आहे. म्हणजेच, सिगारेट खरेदी करण्याचे किमान वय हे वाढतच जाणार आहे. आजपासून ५० वर्षांनंतर एखाद्याला सिगारेट खरेदी करायची असल्यास, तो ६३ वर्षांचा असल्याचे सिद्ध करणारा पुरावा त्याला दाखवावा लागणार आहे.
मात्र, तोपर्यंत लोकांछी सिगारेट ओढण्याची सवय पूर्णपणे गेली असेल, असा विश्वास सरकारने आणि आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. न्यूझीलंड सरकारने २०२५ पर्यंत देशाला ‘सिगारेट-मुक्त’ करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवले आहे. या विधेयकाला काही पक्षांनी विरोध केला होता. सिगारेट विक्री बंद केल्याने अनेक छोट्या व्यावसायिकांना तोटा होणार असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला होता. या कायद्यामुळे कोणताही फायदा होणार नाही, असे या पक्षांचे म्हणणे होते. मात्र, संसदेत झालेल्या मतदानात हे विधेयक ७६ विरुद्ध ४३ मतांनी मंजूर झाले.
सिगारेट बंदीसाठीचे उपाय व परिणाम
न्यूझीलंडमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत (१६ टक्के) सिगारेट ओढणाऱ्यांचे प्रमाण निम्म्यावर.
सध्याही १८ वर्षांपुढील व्यक्तींना सिगारेट विकण्यावर निर्बंध
सिगारेटच्या पाकिटावर आरोग्य इशारा ठळकपणे दिसणे आवश्यक
सिगारेटवर मोठा कर
ज्याचा वापर करणाऱ्यांपैकी निम्म्या लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता असते, त्याची विक्री सुरु ठेवण्यात काहीही अर्थ नाही. सिगारेट टाळून आरोग्य सुधारणार असून त्यामुळे संभाव्य आजारपणावर खर्च होणारे अब्जावधी डॉलर भविष्यात वाचणार आहेत. नव्या कायद्यामुळे युवकांचे भविष्य आरोग्यदायी असेल.
- डॉ. आयेशा व्हेरॉल, आरोग्य मंत्रीc