न्यूझीलंडमध्ये तब्बल 3 महिन्यानंतर पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू 

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 4 September 2020

न्यूझीलंडमध्ये तब्बल तीन महिन्यानंतर पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.

वेलिंग्टन- न्यूझीलंडमध्ये तब्बल तीन महिन्यानंतर पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. न्यूझीलंडमध्ये बऱ्यापैकी कोरोना महामारी नियंत्रणात आली आहे. अशात शुक्रवारी जवळजवळ तीन महिन्यांनतर एका 50 वर्षीय रुग्णाचा कोविड-19 विषाणूमुळे मृत्यू झाला. देशाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. 

न्यूझीलंडमध्ये तब्बल 102 दिवस कोरोनाबाधित एकही रुग्ण सापडला नव्हता. त्यानंतर ऑकलंड प्रांतात मागील महिन्यामध्ये कोरोनाची प्रकरणे आढळून आली. न्यूझीलंडमध्ये आलेल्या दुसऱ्या कोरोना लाटेमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी देशात झालेल्या रुग्णाच्या मृत्यूसह आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. 

तैवानच्या वायुदलानं चीनचं विमान पाडलं? व्हिडिओ व्होतोय व्हायरल

कोरोना संबंधातील या बातमीने न्यूझीलंडच्या लोकांना वाईट वाटेल. आमच्या भावना मृताच्या कुटुंबीयांसोबत आणि समुदायासोबत आहेत, असं आरोग्य प्रमुख अॅशले ब्लुमफील्ड यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं. 

ऑकलंडमधील एका कुटुंबातील 4 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. 100 दिवसात एकही कोरोनाबाधित रुग्ण साडला नसल्याचा आनंद देश साजरा करत असताना, दोन दिवसानंतर कोरोना विषाणूने देशात पुन्हा शिरकाव केल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर कोरोना महामारीने हळूहळू आपले हातपाय पसरवणे सुरु केले. तेव्हापासून आतापर्यंत 152 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. तीन दिवसांपूर्वीच नवे 3 कोरोनाबाधित रुग्ण ऑकलंड प्रांतात आढळले आहेत.

प्रियांका गांधींच्या मदतीने डॉ खान राजस्थानात; योगी सरकारवर गंभीर आरोप

ऑकलंडमध्ये पुन्हा कोरोनाबाधित रुग्ण सापडू लागल्यानंतर प्रांतात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र, संपूर्ण देशात कठोर लॉकडाऊन लागू करण्यात आला नाही. ऑकलंडमध्ये अडीच आठवड्यांच्या लॉकडाऊननंतर रविवारी त्याचा कालावधी संपला. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लोकांना मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे आणि गर्दी न करणे अशा नियमांचे पालन करावे लागणार आहे. भविष्यात आणखी कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दृष्टीने खबरदारी घेत असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत अठराशेच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. देशाची लोकसंख्या 50 लाख आहे.  दरम्यान, जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. अशात  न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा अॅर्डर्न यांनी कोरोना महामारीला नियंत्रणात ठेवल्याने त्यांचे आतंरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Zealand Records First Covid-19 Death In Over Three Months